इतर

इंदोरीच्या खडकाळ माळावर फुलला सेंद्रिय घेवड्याचा हिरवागार मळा!

अकोले प्रतिनिधी

सगळ्या अडचणींना छेद देत जर मनात जिद्द असेल, तर मातीतून सोनं उगवू शकतं – हे सिद्ध केलं आहे इंदोरी (ता. अकोले) येथील श्री. ताराचंद पांडुरंग नवले या उच्चशिक्षित आणि प्रयोगशील तरुण शेतकऱ्याने.

आज जेथे अनेक शेतकरी हवामानाच्या बदलत्या चक्रांमुळे अडचणीत सापडले आहेत, तिथे नवले यांनी सेंद्रिय शेती, आधुनिक तंत्रज्ञान आणि माळरानावरील मेहनतीची पालवी यावर विश्वास ठेवून नव्या वाटा चालून दाखवल्या आहेत.

२४ जानेवारी २०२५ रोजी, नवले यांनी धरती अॅग्रो कंपनीच्या DGL 968 या संकरीत वाणाचा घेवडा पीक मल्चिंग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने २० गुंठे माळरानात लावले. उन्हाळ्याच्या तडाख्यातही हे पीक सेंद्रिय पद्धतीने जोमाने वाढले. फक्त ६५ दिवसांत पहिल्या शेंगांची तोड सुरू झाली आणि आतापर्यंत चार वेळा तोड करत १२ क्विंटल ताज्या शेंगा मुंबई बाजारात विकल्या गेल्या.

सरासरी ४८ रुपये किलो दर मिळाल्याने आतापर्यंत ५० ते ५५ हजार रुपयांचे उत्पन्न हाती आले आहे. पुढील ३–४ महिन्यांत अजून ३ ते ३.५ टन उत्पादन अपेक्षित असून, एकूणात दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत निव्वळ उत्पन्न होण्याचा विश्वास नवले यांनी व्यक्त केला आहे.

या साऱ्या यशामागे केवळ पीक नव्हे, तर एक भावनिक नातं, मातीतले ममत्व आणि माणुसकीने भरलेलं कुटुंब उभं आहे. वडील श्री. पांडुरंग कारभारी नवले यांच्यासोबत लहानपणापासून शेती करत करत ताराचंद यांनी मातीतल्या प्रत्येक बदलाचं निरीक्षण केलं.

“वडिलांचं मार्गदर्शन, आईचं पाठबळ आणि कुटुंबाची साथ यामुळेच आज मी शेतीतल्या प्रत्येक प्रयोगाला यश देऊ शकलो,” असं श्री नवले अभिमानाने सांगतात.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने बाजारात हिरवा, ताजा आणि रासायनिक मुक्त घेवडा मिळणं दुरापास्त झालं आहे. त्यामुळे नवले यांच्या घेवड्याला मुंबई बाजारात १०० रुपये किलो पर्यंत दर मिळण्याची शक्यता आहे. दर्जा, चव आणि सेंद्रिय उत्पादनाची खात्री यामुळे मागणी सातत्याने वाढते आहे.

ताराचंद नवले यांच्या शेतीत रासायनिक खतांचा वापर शून्यावर आणून गाईच्या शेणापासून बनवलेली जिवामृत, घाणखत, आणि शेतीस पोषक घरगुती निविष्ठा यांचा वापर केला जातो. त्यामुळे उत्पादनाचा दर्जा चांगला राहतो आणि बाजारपेठेत त्याला विशेष ओळख मिळते.

फार मोठं भांडवल नसेल, तरी चालेल. पण जमिनीवर निष्ठा आणि प्रयोग करण्याची तयारी हवी. निसर्गाच्या बदलत्या लहरी पेलायच्या असतील, तर सेंद्रिय शेती हीच खरी शाश्वत शेती आहे,” आज माळरान हिरवागार आहे, कारण त्याच्या मुळाशी एक जिद्दी मन, प्रयोगशील डोकं आणि कुटुंबाचा प्रेमळ पाठिंबा आहे.

श्री. ताराचंद पांडुरंग नवले
इंदोरी, ता. अकोले | मो. ९७६७३०४२९८

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button