अहमदनगर

अहिल्यानगर चे माजी आमदार अरुण (काका) जगताप यांचे निधन

अहिल्या नगर-दि २

अहिल्यानगरचे माजी नगराध्यक्ष व विधानपरिषदेचे दोन टर्म सदस्य राहिलेले अरुणकाका बलभीम जगताप यांचे आज दि. २ मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. पुणे येथे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. ते ६७ वर्षांचे होते. त्यांचे निधनाचे वृत्ताने अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

अरुणकाका जगताप यांचं पार्थिव दुपारी २.०० वाजता सारसनगर येथे त्यांच्या राहत्या घरी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्यांच्या पार्थिवावर ४. ०० वाजता अहिल्यानगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून पुणे येथे खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार चालू होते. तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत होते. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो चाहत्यांनी पुण्याकडे धाव घेतली होती. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. अरुणकाकांवर अतिदक्षता विभागात उपचार चालू असल्याने त्यांना कोणालाही भेटता येत नसल्याने नागरिकांनी नगरहून पुण्यात येऊ नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी केले होते.याच दरम्यान त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून त्यांच्या हजारो चाहत्यांनी ठिकठिकाणी महा आरती केली अखेर त्यांनी सर्वांचा निरोप घेतला

अरुण जगताप हे नगरच्या राजकारण आणि समाजकारणात काका नावाने परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी पार्वती, मुले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन, सुना, नातवंडे असा परिवार आहे. भाजपचे राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे ते व्याही होते. अरुण जगताप यांची राजकीय कारकीर्द ही काँग्रेसमधून सुरू झाली. युवक काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. अहमदनगरपालिकेचे नगराध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. जिल्हा क्रिकेट संघटनेचे ते अध्यक्ष होते. तसेच गुणे आयुर्वेद शैक्षणिक संस्थेचे ते अध्यक्ष होते. अरुण जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सलग दोनवेळा स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषदेवर निवडून गेले होते. त्यांच्या निधनान निधनाने जिल्ह्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button