नाशिक – पुणे मार्गावरील चंदनापुरी घाटातील रस्ता तातडीने दुरुस्त करा

अपघाताचे वाढते प्रमाण चिंताजनक डॉ – जयश्रीताई थोरात
संगमनेर ( प्रतिनिधी ) मा.महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून नाशिक – पुणे महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण झाले असून आता नव्याने पुणे – नाशिक महामार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे एकेरी वाहतूक असल्याने चंदनापुरी घाटामध्ये अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी तातडीने रस्त्याचे काम पूर्ण व्हावे या मागणी करता युवक काँग्रेसच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून या कामामुळे वाढलेले अपघाताचे प्रमाण अत्यंत दुर्दैवी असल्याचे युवक काँग्रेसच्या अध्यक्षा कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी म्हटले आहे.
डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका युवक काँग्रेस व चंदनापुरी ग्रामस्थांच्या वतीने प्रांताधिकारी, पोलीस प्रशासन यांना हे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी चंदनापुरीचे सरपंच भाऊराव राहणे, कारखान्याचे संचालक विजय राहणे, अंकुश ताजने,भाऊसाहेब सातपुते, रमेश गफले, विजय पवार, प्रथमेश बालोडे, शरद पावबाके, दीपक पाळंदे, अर्जुन घोडे, दीपक शिंदे, समीर शिंदे, तुषार काकड, किरण खुळे, वैष्णव मुर्तडक, शहाबाद शेख,तुषार गवांदे,रोशन गोपने, विशाल वैराळ,ईश्वर फापाळे आदी उपस्थित होते.

त्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे – नाशिक महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात चंदनापुरी घाटामध्ये बऱ्याच दिवसांपासून काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. हे काम अत्यंत धीम्या गतीने असल्याने. वाहतुकीची गैरसोय होत आहे. त्यामुळे एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. चंदनापुरी घाटातील तीव्र उतारामुळे या ठिकाणी मागील काही महिन्यांमध्ये खूप अपघात झाले आहे. यामध्ये काही नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे सर्व टाळण्यासाठी गावकऱ्यांनी व परिसरातील कार्यकर्त्यांनी टोल प्रशासनाला वेळोवेळी निवेदने देऊन विनंती केली आहे परंतु अद्यापही याबाबत ठोस कारवाई झाली नाही.
यावेळी सरपंच भाऊराव रहाणे म्हणाले की, मा.महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी तालुक्याच्या विकासासाठी नाशिक – पुणे महामार्गाचे चौपदरीकरण दहा वर्षांपूर्वीच पूर्ण केले. या कामात आता नव्याने कॉंक्रिटीकरण होत असून अनेक दिवसांपासून हे काम रखडले आहे. काम का थांबवले आहे हे कळत नाही. त्यामुळे सततची मागणी करूनही काम पूर्ण होत नसल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.
म्हणून युवक काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले असून तातडीने याबाबतची चर्चा घडवून आणावी अशी मागणी केली आहे. या संदर्भाने शुक्रवार 23 मे 2025 रोजी सकाळी साडेनऊ वाजता रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतला असून संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासन व तालुका प्रशासनाची राहील असे चंदनापुरी ग्रामस्थ व काँग्रेसने म्हटले आहे.
पुणे – नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 हा मोठा वाहतुकीचा रस्ता आहे. काँक्रिटीकरण करण्याचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे एकेरी वाहतूक करण्यात आली असून सर्वांची गैरसोय होत आहे. तीव्र उतार आणि जास्त वाहतूक यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून अनेक नागरिकांचा जीव गेला आहे. या अत्यंत दुर्दैवी असून टोल प्रशासन व तालुका प्रशासनाने याबाबत तातडीने बैठक बोलावून मार्ग काढावा असे आवाहन युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.जयश्रीताई थोरात यांनी केले आहे.