रेशनकार्ड व ऑनलाइन प्रक्रिया गतिशील करा :रामदास फुले यांचे मंत्री भुजबळ यांना निवेदन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)-
गोरगरीब व वंचित नागरिकांना नियमितपणे शिधा धान्य मिळावे, यासाठी अडथळा ठरत असलेली रेशनकार्ड व ऑनलाईन प्रक्रिया विनाविलंब व्हावी, या मागणीसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे नगर तालुकाध्यक्ष रामदास फुले यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना.छगन भुजबळ यांना निवेदन दिले.
फुले यांनी भुजबळ यांची मुंबई येथे भेट घेऊन गरजू लाभार्थ्यांच्या समस्या मांडून लक्ष वेधले. अहिल्यानगर जिल्हा व तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांची रेशनकार्डची नोंदणी अद्याप अपूर्ण आहे, तर काहींच्या कार्डावर धान्य वितरण रखडलेले आहे.
रेशन कार्डासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया अत्यंत संथ असून महिनोमहिने प्रलंबित राहत आहे. यामध्ये अनेकांना खासगी एजंटकडेच धाव घ्यावी लागते, अन्यथा प्रक्रिया मार्गी लागत नाही. परिणामी गोरगरीब नागरिकांना अन्नधान्यापासून वंचित रहावे लागत असून, ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
संबंधित यंत्रणांनी रेशनकार्ड व ऑनलाईन प्रक्रियेची अंमलबजावणी अधिक पारदर्शक व गतीशील करावी. जेणेकरून गोरगरिबांना शिधा धान्य मिळण्याचा मार्ग मोकळा होवा. तसेच रेशन कार्ड व ऑनलाईन प्रक्रिया गतिशील करून धान्य वितरणाच्या अडचणी दूर करा असे रामदास फुले यांनी म्हटले आहे
. अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ,यांना निवेदन देताना माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ ,समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष अंबादास गारुडकर, कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, प्रचारक नागेश गवळी, जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, तालुका अध्यक्ष रामदास फुले, प्रदेश सरचिटणीस अनिल निकम ,बंडू कोथिंबिरे, अनिल चौधरी, अनिल गाडीलकर, शंकर भुजबळ ,सुभाष गायकवाड आदी सह मोठ्या संख्येने समता परिषदेचे सदस्य उपस्थित होते .
………….