रूईछत्रपती येथे एक तास ज्ञान मंदिराच्या ऋणानुबंधाचा उपक्रमाचा प्रारंभ

पारनेर प्रतिनिधी:–
पारनेर तालुक्यातील श्री ज्ञानेश्वर विद्यालय रुई छत्रपती येथे शिक्षण घेतलेल्या सर्वच क्षेत्रातील यशस्वी माजी विद्यार्थ्याना विशेष आमंत्रित करून त्यांचे मार्गदर्शन शाळेच्या विद्यार्थ्यांसह परिसरातील तरुणांना मिळावे याचसाठी श्री ज्ञानेश्वर विद्यालय व श्री छत्रपती आजी-माजी सैनिक संघटना रूई छत्रपती यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासन द्वारा संचलीत विद्यालयातील आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत “एक तास ज्ञान मंदिराच्या ऋणानुबंधाचा…” या उपक्रमाचा भव्य उपक्रम प्रारंभ कार्यक्रम शनिवार दिनांक 21 जून 2025 रोजी सकाळी 10 वा. श्री ज्ञानेश्वर विद्यालय रुई छत्रपती येथे मोठ्या दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाला.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ग्रामविकास शिक्षण संस्थेचे सचिव श्री आत्माराम शिंदे सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये नवीन उपक्रम अत्यंत प्रेरणादायी असून शाळेच्या इमारतीचे लवकरच जीर्णोद्धार करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. तर प्रमुख पाहुणे म्हणून आलेले श्री सुभाष रसाळ सर, माजी प्राचार्य, मुधोजी महाविद्यालय, फलटण यांनी आपल्या मनोगतात 1976 साली शाळेच्या प्रारंभापासून जपलेल्या नाडी विषयी अवगत करताना शाळा स्थापनेच्या कठीण परिस्थितीची जाणीव करून दिली व पुन्हा एकदा पहिली बॅचचे स्नेहसंमेलन आयोजित करण्याचा मानस असल्याचे सांगितले. श्री आप्पासाहेब रावडे सर, माजी मुख्याध्यापक यांनी मान्यवरांचा परिचय करून विद्यार्थ्यांनी बालपणापासून ध्येय निश्चित करावे व परिसरातील तरुणांनीही या योजनेचा लाभ घेण्यास सुचवले. कार्यक्रमासाठी मुख्य उपस्थिती प्रा. डॉ. सुदामराव मांडगे सर, प्राचार्य हडपसर महाविद्यालय यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देऊन परिसरातील माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा शाळेकडे वळून मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले.
या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना नव नवीन क्षेत्राविषयी अवगत करून निवडलेल्या क्षेत्राकडे झेपावण्यासाठी प्रोत्साहन देणे, माजी विद्यार्थ्यांची शाळेशी तुटलेली नाळ पुन्हा जुळण्यासाठी, शाळा व माजी विद्यार्थी यांचे अल्पसे खंडित झालेले नाते पुन्हा नव्याने बहरून एका नव्या शैक्षणिक युगाची सुरुवात होईल. पटसंख्या व गुणवत्ता वाढीसाठी नवीन उपाय, उपक्रम, संकल्पना समोर येऊन विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठी माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभेल.
विद्यार्थ्यांचा व शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी एक छोट्याशा पावलाने सुरुवात होईल.
अशाप्रकारे उद्देश समोर ठेवून प्रत्येक शनिवारी एक तास आपापल्या क्षेत्रातील नामवंत माजी विद्यार्थ्यास आमंत्रित करून त्यांचे मार्गदर्शन ठेवण्यात येणार आहे. तरी त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा अशी विनंती करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री प्रकाश तडके सर यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री राजू मेहेत्रे, राज्यकर निरीक्षक यांनी कार्यक्रमाची संकल्पना मांडली. तर आभार श्री चंद्रकांत बारवकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री छत्रपती आजी-माजी सैनिक संघटनेचे श्री नाना दिवटे, श्री शिवाजी साबळे, श्री बी एन साबळे, सुभेदार राजेंद्र साबळे, श्री संपत नाईक, श्री सुभाष वाबळे, श्री मोहन साबळे व श्री संजय साबळे यांनी मेहनत घेतली.
या उपक्रम प्रारंभ कार्यक्रमासाठी सौ. मैनाताई सोन्याबापू साबळे सरपंच, श्री बंडू साबळे अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, श्री गोरख दिवटे माजी सरपंच, श्री संदीप बेल्हेकर यांच्यासह श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच रुई छत्रपती व परिसरातील ग्रामस्थ, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.