तिखोल-पारनेर रस्त्याची दुरवस्था;ग्रामस्थ आक्रमक

दत्ता ठुबे
पारनेर/प्रतिनिधी :
तालुक्याच्या उत्तर भागातील नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गापासून तिखोल, बहिरोबावाडी, कीन्ही, करंडी मार्गे पारनेर शहराकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण स्वातंत्र्यानंतर प्रथमच एक वर्षापूर्वी पूर्ण झाले. मात्र, अवघ्या एका वर्षात हा रस्ता ठिकठिकाणी खराब झाला असून, खड्ड्यांनी चाळण झाली आहे.
निकृष्ट दर्जाच्या कामामुळे तिखोल येथील ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत ठेकेदाराला दोषी ठरवले आहे. रस्त्यावर सूचनाफलक नसणे, पुलांना कठडे नसणे यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत नवीन डांबरीकरणाचा लेयर न टाकल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.या रस्त्याच्या कामात ठेकेदाराने अत्यंत खालच्या दर्जाची सामग्री वापरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
यावेळी माजी सभापती अरुणराव ठाणगे सरपंच भाऊसाहेब ठाणगे, माजी सरपंच रावसाहेब टिकल, इंजि. संकेत ठाणगे, माजी चेअरमन नागचंद ठाणगे, माजी उपसरपंच सोनू मंचरे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय ठाणगे, संभाजी ठाणगे, निस्सार तांबोळी, पांडुरंग तांबडे, महेश ठाणगे, गोरख ठाणगे, किरण ठाणगे, अशोक ठाणगे, शिवाजी ठाणगे, रेवन कावरे यांनी ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा निषेध केला. रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला.हा रस्ता तालुक्याच्या ग्रामीण भागाला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. मात्र, खराब रस्त्यामुळे प्रवास जिकिरीचा झाला आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या असून, लवकरच कारवाईची मागणी केली आहे. प्रशासन आणि ठेकेदार यांच्याकडून यावर काय उपाययोजना होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एक वर्षापूर्वीच तिखोल रस्त्याचे काम सुरू असताना ठेकेदाराच्या निदर्शनास आणून दिले होते. रस्त्याला वर्ष ही पूर्ण होत नाहीत तोच ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. ठेकेदाराने आम्हाला पुन्ह नव्याने रस्त्यावर डांबरी लेयर टाकून द्यावा ही मागणी आहे. अन्यथा आंदोलनाची भूमिका घेऊअरुणराव ठाणगे(माजी सभापती पारनेर बाजार समिती)
रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा संशय
तिखोल रस्त्याचे काम ठेकेदाराच्या निष्काळजी पणामुळे अतिशय निकृष्ट झाले आहे. डांबराचा वरचा लेयर हा हाताने बाजूला होतो आहे. स्वातंत्र्यानंतर रस्त्याचा प्रश्न पहिल्यांदाच मार्गी लागला परंतु त्या कामांमध्ये ही मोठा भ्रष्टाचार झाल्याचे संशय आहे. असे मत स्थानिक ग्रामस्थ व तिखोल सेवा सोसायटीचे माजी व्हा. चेअरमन अश्विन उर्फ सोनू मंचरे यांनी सांगितले.