अकोल्यातील रेशन घोटाळ्यातीलअधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करा – ग्राहक पंचायत.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांच्या कडे तक्रार
अकोले (प्रतिनिधी)
अकोले आदिवासी भागातील सातेवाडी गटातील खेतेवाडी, मोरवाडी गावांतील नागरिकांसाठी दोन ट्रक मालमोटारीमधून तांदूळ सोमवार सात जुलै रोजी रेशन दुकानात नेण्यात येत होता. मात्र यापैकीच एक धान्याची मालमोटार विनापरवाना अकोले विविध कार्यकारी सोसायटीच्या गोदामात ऐनवेळेस खाली करण्यात (उतरविण्यात) आलेल्या तांदळाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्राहक पंचायत च्या वतीने करण्यात आली.
महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगनराव भुजबळ, अहिल्यानगर जिल्हा अधिकारी यांना इमेल व पोष्ट व्दारे निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहे. अकोल्याचे निवासी नायब तहसिलदार किसन लोहरे यांना ग्राहक पंचायत चे जिल्हा उपाध्यक्ष तथा भाजपचे तालुका सरचिटणीस मच्छिंद्र मंडलिक, तालुका अध्यक्ष दत्ता शेणकर यांनी निवेदन दिले.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अकोले आदिवासी तालुक्यामध्ये खेतेवाडी, मोरवाडी गावातील नागरिकांसाठी रेशनचा तांदूळ दोन मालमोटार ट्रक पैकी एक ट्रक 70.40 क्विंटल तांदळाचा काळाबाजार होत असतानाच अकोल्यातील सजग सामाजिक नागरीक कार्यकर्त्यांनी सतर्कता ठेऊन यातील खरा प्रकार उघडकीस आणला.
तसेच ह्या बाबत संबंधित तहसीलदार, पुरवठा अधिकारी, ठेकेदार व कर्मचाऱ्यांची सविस्तर चौकशी होऊन तातडीने गुन्हे दाखल करावेत, या पूर्वी अनेक वेळा रेशनचा काळाबाजार घडलेला आहे.याची आपण त्वरीत गांभीर्याने दखल घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर ग्राहक पंचायतचे मच्छींद्र मंडलीक, दत्ता शेणकर महेश नवले, प्रमोद मंडलीक, दत्ता ताजणे, राम रुद्रे, भाऊसाहेब वाकचौरे आदिंचे नावे आहे.
.