एल्डर लाईन १४५६७’ टोल फ्री हेल्पलाईन ठरली ज्येष्ठांचा हक्काचा आधार लाखो ज्येष्ठांना दिलासा ;

३० हजारांहून अधिकांना मिळवून दिला न्याय
‘
अहिल्यानगर, दि.११ :- ज्येष्ठांच्या व्यथा ऐकून त्यांना हक्काचा दिलासा देणारी ‘एल्डर लाईन १४५६७’ ही राष्ट्रीय टोल फ्री हेल्पलाईन आज लाखो वृद्धांसाठी आधारस्तंभ ठरली आहे. सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने सुरू झालेल्या या उपक्रमाला महाराष्ट्रात ऑगस्ट २०२१ पासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आजपर्यंत राज्यभरातून ४ लाखांहून अधिक कॉल्सवर संवाद साधून ३० हजारांहून अधिक प्रकरणांचा यशस्वी निकाल लावण्यात आला आहे.
देशात सध्या ६० वर्षांवरील नागरिकांची संख्या १५ कोटींपेक्षा अधिक असून ती पुढील काही दशकांत ३५ कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. वृद्धांच्या समस्या जाणून त्यांचे निवारण व्हावे, म्हणून ही हेल्पलाईन राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान (NISD), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाज कल्याण आयुक्तालय व जनसेवा फाउंडेशन यांच्या माध्यमातून राज्यभर कार्यरत आहे.
सकाळी ८ ते संध्याकाळी ८ या वेळेत आठवड्यातील सातही दिवस चालणाऱ्या या सेवेच्या माध्यमातून वृद्धाश्रम व आरोग्याची माहिती, कायदेविषयक मार्गदर्शन, भावनिक आधार, कौटुंबिक वाद निवारण, पोलीस मदत व हरवलेल्या ज्येष्ठांचा शोध घेण्याच्या सेवा पुरवल्या जातात.
मुंबईतील स्मृती हरवलेल्या वृद्ध गृहस्थाला गुजरातमधील नातेवाईकांपर्यंत पोहोचवणे, शिर्डीत दर्शनाला आलेल्या वृद्ध महिलेला मुलाच्या दुर्लक्षानंतर पुन्हा घरी आणणे, अमरावतीच्या वृद्ध दांपत्याला मुलाकडून खर्च मिळवून देणे यांसारख्या अनेक उदाहरणांतून ‘एल्डर लाईन’ने आपली परिणामकारकता सिद्ध केली आहे.
ही हेल्पलाईन जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून प्रकल्प व्यवस्थापक स्मितेश शहा, टीम लीडर प्रियांका कांबळे, स्टेला काकडे व राजेंद्र आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली अखंडपणे सुरू आहे.
ज्येष्ठांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी कोणत्याही समस्येसाठी निःसंकोचपणे १४५६७ या क्रमांकावर संपर्क साधावा आणि www.elderline.dosje.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.