वीज कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर मुंबईत कामगार आयुक्त कार्यालयात बैठक सम्पन्न –

मुंबई दि 27 महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य कार्यालय, मुंबई येथे एक महत्त्वपूर्ण त्रिपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून महाराष्ट्र राज्यातील क्रिस्टल एजन्सी व स्मार्ट एजन्सीमार्फत कार्यरत कामगारांचे वेतन प्रलंबित असल्याचा गंभीर मुद्दा संघटनेने मांडला. या संदर्भात संघटनेतर्फे मुख्य नियोक्ता व संबंधित व्यवस्थापनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता.
मा. संकेत कानडे (कामगार उपायुक्त, ग्रामीण) यांच्या मार्गदर्शनाखाली व सौ. साकोरे (सहाय्यक कामगार आयुक्त) यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.या बैठकीस महावितरणकडून श्री. ललित गायकवाड, सौ. देवडीया तसेच संघटनेकडून अध्यक्ष श्री. निलेश खरात, सरचिटणीस श्री. सचिन मेंगाळे, उपाध्यक्ष श्री. कमाल खान सुमित कांबळे व संबंधित एजन्सींचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान, कंत्राटदारांकडून वेतन न दिल्यास मुख्य नियोक्ता म्हणून महावितरणने कामगारांना वेतन द्यावे, अशी ठाम मागणी संघटनेचे अध्यक्ष श्री. निलेश खरात व सरचिटणीस श्री. सचिन मेंगाळे यांनी केली.
यावेळी तांत्रिक कारणांमुळे वेतन देण्यात विलंब झाल्याचे सांगण्यात आले असून, लवकरच महावितरण प्रशासन, कंत्राटदार एजन्सी व संघटना यांच्यात पुन्हा त्रिपक्षीय बैठक घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले.
महाराष्ट्रातील वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटना सातत्याने लढा देत आहे. या पार्श्वभूमीवर येत्या दि. १६ एप्रिल २०२६ रोजी मुंबई येथे आयोजित आक्रोश मोर्चा अटळ असून तो मोठ्या प्रमाणावर पार पडणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ सर्व कामगारांना आवाहन करीत आहे की, या आक्रोश मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या हक्कांसाठी एकजूट दाखवावी असे आवाहन केले आहे



