माका येथील नारळी सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता

परमार्थाचा मार्ग स्वीकारून संतांची सेवा केल्यास काहीच कमी पडत नाही.” – महंत सुरेशानंद महाराज
नेवासा / माका प्रतिनिधी :
दत्तात्रय शिंदे
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा, शेवगाव आणि पाथर्डी या तीन तालुक्यांच्या सीमेलगत असलेल्या नेवासा तालुक्यातील माका येथील ग्रामदैवत मंकावती देवीच्या पावनभूमीत
नारळी सप्ताहाची अत्यंत भक्तिमय वातावरणात सांगता झाली
रेंगावर जि.बीड येथील महंत सुरेशानंद महाराज शास्त्री यांच्या अधिपत्याखाली हा धार्मिक सोहळा संपन्न झाला. दि. १ मे रोजी पंचक्रोशीतून आलेल्या असंख्य भाविक भक्त, संत-महंत आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत काला कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली. संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.
“जीवनात परमार्थाचा मार्ग स्वीकारून संतांची सेवा केल्यास काहीच कमी पडत नाही.” असे यावेळी महंत सुरेशानंद महाराज यांनी कीर्तनातून भाविकांना प्रबोधन केले
त्यांच्या या विचारांनी उपस्थित भाविकांना आध्यात्मिक प्रेरणा मिळाली.
सप्ताहा दरम्यान दररोज सकाळी व सायंकाळी राज्यातील नामांकित कीर्तनकारांनी कीर्तन सेवा दिली. तसेच भाविकांसाठी दिवसरात्र भोजन व्यवस्था करण्यात आली होती. विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे सप्ताह विशेष आकर्षण ठरला.
या कार्यक्रमाला पंचक्रोशीसह इतर तालुके व जिल्ह्यांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमास खा.रामराव वडकुते, आ. सुरेश आण्णा धस, आ.विठ्ठलराव लंघे, नगरच्या महापौर ज्योतिताई गाडे, अमोल गाडे, अभय आठवले, भैय्या साहेब धस, नवनाथ पडळकर, भारत शिंगाडे, कोळेकर साहेब, डॉ. स्नेहलता सोनटक्के, चितळकर , नरोटे रामहरी महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माका ग्रामस्थ व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले.



