इतर

ओडिसात ऐतिहासिक वीज कामगार आंदोलन!

वीज क्षेत्रातील कंत्राटी, आउटसोर्सिंग व तांत्रिक १० हजार हून अधिक कामगार रस्त्यावर!

ओडीसा दि. २२ मे

ओडीसा राज्यातील मोठ्या प्रमाणावरील कंत्राटी कामगार कपातीविरोधात संघर्ष उभा राहिला आहे

ओडिशामधील वीज क्षेत्रातील कंत्राटी व आउटसोर्सिंग कामगारांनी सुरू केलेल्या ऐतिहासिक आंदोलनाचा आज पाचवा दिवस असून महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे.


टाटा पॉवर DISCOMS अंतर्गत मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या कामगार कपातीविरोधात ओडिशातील १०,००० हून अधिक वीज क्षेत्रातील कंत्राटी, आउटसोर्सिंग व तांत्रिक कामगार तीव्र आंदोलन करत आहेत. कडक उन्हात व प्रतिकूल परिस्थितीतही कामगार न्याय, रोजगार सुरक्षा, सामाजिक संरक्षण आणि आपल्या कुटुंबांच्या उपजीविकेसाठी संघर्ष करत आहेत.


सदर आंदोलन हे केवळ रोजगार वाचविण्यापुरते मर्यादित नसून हजारो कुटुंबांच्या अस्तित्वाशी निगडित प्रश्न बनला आहे. ओडिशातील विविध वीज वितरण कंपन्यांमध्ये (DISCOMS) दीर्घकाळ कार्यरत कामगारांना अचानक रोजगारापासून वंचित करणे, ठेका पद्धतीतील अन्याय, वेतन असमानता, सामाजिक सुरक्षा योजनांचा अभाव आणि रोजगारातील अस्थिरता यामुळे कामगारांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.
भारतीय मजदूर संघ संलग्न विविध संघटनांनी या अन्यायाविरुद्ध उभारलेला संघर्ष आता व्यापक जनआंदोलनाचे स्वरूप धारण करत असून कामगारांचा आवाज दडपण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होणार नाही, अशी ठाम भूमिका संघटनांनी घेतली आहे.


अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचा सक्रिय हस्तक्षेप
भारतीय मजदूर संघ संलग्न अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाने या आंदोलनात सक्रिय हस्तक्षेप करत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री श्री मनसुख मांडवीय तसेच ओडिशाचे मुख्यमंत्री मोहनचरण माझी यांना लेखी निवेदन पाठवून तात्काळ सकारात्मक हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.


महासंघाचे अध्यक्ष श्री कंदी श्रीनिवास व महामंत्री श्री सचिन मेंगाळे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे की, रोजगारापासून वंचित करण्यात आलेल्या सर्व कामगारांना तात्काळ पुन्हा कामावर घेण्यात यावे, रोजगारामध्ये स्थैर्य देण्यात यावे तसेच भारतीय मजदूर संघ व कामगार प्रतिनिधींशी तातडीने सकारात्मक चर्चा आयोजित करण्यात यावी.
ओडिशातील कामगार कपात तात्काळ थांबविण्यात यावी .
भारतीय मजदूर संघ कामगार प्रतिनिधींशी सकारात्मक चर्चा करण्यात यावेत अन्यायग्रस्त कामगारांना पुन्हा सेवेत घेण्यात आले यावे अन्यथा देशव्यापी आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात येईल आणि अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ देशभरात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारेल असा इशारा महासंघ सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिला .


ही केवळ ओडिशाची लढाई नाही


संघटनांनी स्पष्ट केले आहे की, ही केवळ ओडिशातील कामगारांची लढाई नसून देशातील प्रत्येक कंत्राटी व आउटसोर्सिंग कामगाराच्या अस्तित्वाची आणि सन्मानाची लढाई आहे. आज ओडिशामध्ये जे घडत आहे, ते उद्या इतर राज्यांमध्येही घडू शकते. त्यामुळे देशभरातील कामगार संघटना, सामाजिक संघटना व सर्वसामान्य जनतेने या संघर्षाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची गरज आहे.
कामगारांचा आवाज दडपला जाऊ शकत नाही!
न्याय मिळण्यास विलंब होणे म्हणजे न्यायाचाच इन्कार होय!
कामगारांच्या घामावर उद्योग उभे राहतात — मग त्यांच्या अस्तित्वावरच संकट का? असा सवाल महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ अध्यक्ष निलेश खरात यांनी केला असून लवकरच भुवनेश्वर येथील आंदोलनात सहभाग देण्यात येणार आहे असे निलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी सांगितले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button