रोटरी क्लब ऑफ नाशिक तर्फे अॅक्वा थेरपी शिबिर संपन्न

नाशिक : रोटरी क्लब ऑफ नाशिक.तर्फे फिजियोकेअर ॲक्वाटिक थेरपी ॲण्ड रिहॅबिलिटेशन सेंटर येथे अॅक्वा थेरपी विषयावर एक माहितीपूर्ण व संवादात्मक शिबिर आयोजित करण्यात आले होते.उत्तर महाराष्ट्रातील पहिले अॅक्वा थेरपी केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संस्थेमध्ये आयोजित कार्यक्रमाला रोटेरियन सदस्य व त्यांच्या कुटुंबीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिरात डॉ. मैथिली भाके आराधी यांनी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले . त्या न्युरो फिजिओथेरपिस्ट असून त्यांना अॅक्वा थेरपीमध्ये स्वित्झर्लंडचे तसेच टोटल मोशन रिलीज थेरपीमध्ये अमेरिकेचे विशेष प्रमाणपत्र प्राप्त आहे. त्यांनी आधुनिक पुनर्वसन उपचारांमध्ये अॅक्वा थेरपीचे महत्त्व, फायदे व उपयोग याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
डॉ. मैथिली यांनी सांगितले की, जमिनीवर कठीण वाटणारे व्यायाम व हालचाली पाण्यात सहजरीत्या करता येतात. पाण्याच्या शक्तीमुळे आणि नियंत्रित प्रतिकारामुळे रुग्णांना अधिक जलद व प्रभावी परिणाम मिळतात.
त्यांनी पुढे सांगितले की, अॅक्वा थेरपीचा उपयोग न्यूरोलॉजिकल, ऑर्थोपेडिक तसेच बालरोग संबंधित अनेक समस्यांमध्ये होऊ शकतो. पाठदुखी, गुडघेदुखी यांसारख्या सामान्य तक्रारींपासून पार्किन्सन्स, अल्झायमर, व्हर्टिगो तसेच ADHD, ऑटिझम, सेरेब्रल पाल्सी आणि विकासातील विलंब असलेल्या मुलांनाही या उपचारपद्धतीचा मोठा फायदा होतो. नियंत्रित तापमानातील पाण्यात ही थेरपी दिल्यामुळे अधिक चांगला व जलद आराम मिळतो.
कार्यक्रमादरम्यान अॅक्वा थेरपीचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले. रोटेरियन सदस्यांनी विविध उपचार पद्धतींमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला. तसेच उपचार घेत असलेल्या काही रुग्णांनी आपले अनुभव उपस्थितांसमोर मांडले, ज्यामुळे या थेरपीची परिणामकारकता अधिक स्पष्ट झाली.
हा कार्यक्रम अत्यंत माहितीपूर्ण व प्रेरणादायी ठरला. आधुनिक उपचारपद्धती आणि पुनर्वसनाविषयी अधिक सखोल माहिती मिळाल्याची भावना उपस्थित रोटेरियन सदस्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष डॉ.गौरव सामनेरकर शिल्पा पारख, मोना सामनेरकर, लिना बाकरे,अनिल सुकेनकर,मकरंद चिंधडे, विजय दीक्षित,उर्मी दिनानी, वृषाली ब्राह्मणकर,रोहित देशपांडे आदी उपस्थित होते.



