सामाजिक

श्रीरामपुरातील सेवाभावी व्यक्तिमत्त्वे सेवाप्रेरणा देतात : सुबोधदादा


श्रीरामपूर प्रतिनिधी

श्रीरामपुरातील ॲङ् रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान, विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान, वाचन संस्कृती प्रतिष्ठान आदी सेवाभावी संस्था आणि त्यासंदर्भातील व्यक्तिमत्वे आमच्या सेवाकार्याला सदैव प्रेरणा देणाऱ्या आहेत, असे विचार चंद्रपूर जिल्ह्यातील अड्याळ टेकडी येथील सेवासंस्थेचे मुख्य संचालक सुबोध दादा यांनी व्यक्त केले.

श्रीरामपूर येथील विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे अड्याळ टेकडी येथून आलेले मुख्य संचालक सुबोधदादा, इतर सेवा कार्यकर्त्यांचा सत्कार व विविध पुस्तक प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य टी.ई. शेळके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, डॉ. शरद दुधाट उपस्थित होते. यावेळी अड्याळ टेकडी येथील ग्रंथ निर्मिती आणि दिनदर्शिका यांचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या ‘साहित्य संवाद ‘ पुस्तकाचे वितरण व कौतुक करण्यात आले.

‘साहित्य संवाद ‘ म्हणजे जिल्ह्यातील साहित्यिक उपक्रमांचा दस्तऐवज : – डॉ. बाबुराव उपाध्ये
‘साहित्य संवाद ‘ पुस्तकाचा परिचय सादर करताना लेखक डॉ. बाबुराव उपाध्ये म्हणाले की, १९७७ पासून जिल्ह्यातील विविध उपक्रमांत खूप साहित्यिक भेटले, खेडोपाडी, वाड्यावस्त्यावर साहित्य मेळावे, कविसंमेलने, पुस्तक प्रकाशने, साहित्य प्रबोधन कार्यक्रम घेतले, त्या त्या प्रसंगाचे हे लेखन आहे, त्यामुळेच २०१० – ११ या काळातील हे संदर्भ आहेत, त्या उभारत्या काळातील हा साहित्य दस्तऐवज आहे. पत्रकार,ॲङ् बाळासाहेब तनपुरे यांची वाचनीय प्रस्तावना आणि चरित्रकार संतोष लेंभे यांचा अभिप्राय यातून या पुस्तकाचे वाङ्‌मयीन मूल्य अधोरेखित केले आहे.
———————–

अड्याळ टेकडी येथील उद्धवभाऊ मोहोड, सौ. सविताताई मोहोड, उद्धवभाऊ खाडे, सौ. रिनाताई खाडे, खुशीताई मारबते, संदीपभाऊ कटकूटवार यांचाही सन्मान करण्यात आला. संयोजक सुखदेव सुकळे यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. प्राचार्य शेळके, सुखदेव सुकळे, डॉ. बाबुराव उपाध्ये, सौ. सुरेखाताई बुरकुले, संजय बुरकुले यांनी मान्यवरांचे सत्कार केले. सुबोधदादा म्हणाले,स्व. ॲङ् रावसाहेब शिंदे यांच्यामुळे अड्याळ टेकडीचे तुकाराम दादा, आनंदवनचे डॉ. बाबा आमटे, शेगावचे शिवशंकर भाऊ पाटील श्रीरामपूर सेवा पॅटर्न तयार झाला, त्यामुळे श्रीरामपूरचे सेवानाते घट्ट झाले, तोच सेवा आदर्श आजही जपला जातो, हे कौतुकास्पद, प्रेरणादाची असल्याचे सांगितले. प्रा. डॉ. शरद दुधाट यांनी आनंदवन, शेगाव, अड्याळ टेकडीचे अनुभव सांगितले.
प्राचार्य टी. ई. शेळके यांनी अध्यक्षीय भाषणातून सेवाकर्म हा मानवधर्म असून त्या संदर्भाने कार्यरत असणारे सुबोध दादा आजच्या काळातील खरे संत असून त्यांचा सन्मान म्हणजे सेवाकर्मीचा सन्मान असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन डॉ. उपाध्ये यांनी केले. सुयोग बुरकुले, संकेत बुरकुले, सुरेखा बुरकुले यांनी नियोजन केले. सुखदेव सुकळे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button