क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्रासाठी १४ कोटींचा निधीचे वितरण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून नायगावच्या ऐतिहासिक विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल!
मुंबई | दि. २४ नोव्हेंबर २०२६
स्त्रीशिक्षणाचा पाया रचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मभूमी असलेल्या नायगावच्या विकासासाठी राज्य शासनाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नायगाव येथे उभारण्यात येणाऱ्या ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्रा’च्या कामाला गती देण्यासाठी शासनाने तब्बल १४ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दि. २३ नोव्हेंबर २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला आहे. या निर्णयानुसार मौजे नायगाव येथील स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्राच्या बांधकामासाठी आवश्यक जमिनीच्या संपादनासाठी आणि प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांसाठी एकूण १४ कोटी रुपयांचा निधी सातारा जिल्हा परिषदेला वितरित करण्यात येणार आहे.
या प्रकल्पासाठी यापूर्वी स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्राच्या बांधकामाकरिता ११०.५६ कोटी रुपये, तर आवश्यक जमीन संपादनासाठी १५ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर यापूर्वीही या प्रकल्पासाठी निधी वितरित करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासन आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून नायगावच्या विकासाला प्राधान्य दिले जात आहे. सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव करणारे भव्य स्मारक उभारण्यासोबतच महिला प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा जपणारे स्मारक आणि महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देणारे प्रशिक्षण केंद्र साकारण्याच्या दिशेने १४ कोटींच्या निधी वितरणाचा शासन निर्णय हा नायगावच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे!

