इतर

मवेशी येथे २५ नोव्हेंबरपासून ​राजुर प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचा थरार..!

​अकोले  प्रतिनिधी 

 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, राजुर अंतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा सन २०२६-२७ साठी जय्यत तयारी  केली आहे. शैक्षणिक संकुल मवेशी (ता. अकोले) येथे २५ नोव्हेंबर २०२६ पासून या स्पर्धांचा थरार रंगणार असून, चार केंद्रांतील आश्रमशाळांचे खेळाडू आपले क्रीडाकौशल्य पणाला लावणार आहेत.

​स्पर्धेच्या सुयोग्य नियोजनासाठी प्रकल्प कार्यालय सभागृह, राजुर येथे आढावा बैठक पार पडली. 

प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीला सहाय्यक प्रकल्प अधिकारी (प्रशासन) मनोज पैठणकर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) दीपक कालेकर आणि सहाय्यक प्रकल्प अधिकारी (नियोजन) योगेश ढोणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

​या क्रीडा स्पर्धांमध्ये राजूर प्रकल्पांतर्गत 21 शासकीय व 18 अनुदानित आश्रमशाळेतील केळी रुम्हणवाडी, केळी कोतुळ, अकलापूर आणि मवेशी या चार केंद्रांतील केंद्रस्तरीय स्पर्धेतील यशस्वी   510 मुले तर 584 मुली असे 1094 खेळाडू सहभागी होणार आहेत.

​क्रीडा प्रकार व वयोगट

मुले व मुली यांच्या १४, १७ आणि १९ वर्षांखालील वयोगटात खालील सांघिक व वैयक्तिक स्पर्धा होतील:सांघिक खेळ: कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल आणि हँडबॉल. वैयक्तिक व मैदानी खेळ: सर्व प्रकारच्या धावणे व चालणे शर्यती, ४x१०० व ४x४०० रिले शर्यती, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, भालाफेक आणि थाळीफेक.

​

​स्पर्धा शिस्तबद्ध, पारदर्शक आणि निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. क्रीडा मैदानांची आखणी, खेळाडूंची निवास व भोजन व्यवस्था, आरोग्य सुविधा प्रकल्पस्तरीय स्पर्धेतील खेळाडुंच्या वाहतुकीसाठी राज्य परिवहन मंडळाच्या एस.टी. बस शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नियोजन आणि बक्षीस वितरण यांसह विविध समित्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. विभागीय स्तरासाठी दर्जेदार आणि गुणवान खेळाडूंची निवड व्हावी, यासाठी सर्व समित्यांनी समन्वयाने काम करावे, असे मार्गदर्शन मान्यवरांनी केले.

​या बैठकीस मुख्याध्यापक शिवाजी नरके, मुख्याध्यापक पंडित कदम, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक कमलाकर हंडीबाग, कुलदीप पाटील आणि गंगाराम करवर नानासाहेब झरेकर यांच्यासह विविध समित्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button