इतर

अकोले येथे वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी शिक्षक प्रशिक्षण उत्साहात संपन्न!


शिक्षकांच्या व्यावसायिक सक्षमीकरणाला नवी दिशा


अकोले : दि 23 -राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट), संगमनेर यांच्या अंतर्गत दि. १३ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत अकोले तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेले तालुकास्तरीय वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण अत्यंत उत्साहपूर्ण व शैक्षणिक वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाले.


शिक्षकांच्या सेवाकाळातील व्यावसायिक विकासाला चालना देणे, अध्यापन कौशल्य अधिक प्रभावी करणे आणि बदलत्या शैक्षणिक प्रवाहानुसार शिक्षकांना सक्षम बनविणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश होता.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२४ यांच्या अनुषंगाने शालेय कामकाजाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षकांना विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९, विविध शासकीय शैक्षणिक योजना, शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF), विद्यार्थ्यांचे समग्र मूल्यमापन, अध्ययन-अध्यापनातील नावीन्यपूर्ण पद्धती तसेच शिक्षकांचा सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास या विषयांवर विशेष भर देण्यात आला.


जिल्हा वरिष्ठ अधिव्याख्याता श्री. अरुणजी भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले तालुक्यातील विस्तार अधिकारी श्रीमती सविता कचरे , श्री. भाऊसाहेब पुरी , केंद्रप्रमुख श्री. चंद्रशेखर हासे व श्री. संदीप कोते यांच्या मार्गदर्शनातून प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले होते.
या प्रशिक्षणाचे वैशिष्ट्य म्हणजे एकूण २२ सुलभकांची तज्ज्ञ टीम आणि तंत्रस्नेही शिक्षकांचे लाभलेले सहकार्य होय. वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणीच्या शिक्षकांसाठी स्वतंत्र गटांमध्ये प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले होते. प्रशिक्षणार्थींना केवळ सैद्धांतिक माहिती न देता प्रत्यक्ष शालेय परिस्थितीशी निगडित उदाहरणे, कृती, चर्चा, अनुभवांची देवाणघेवाण आणि आधुनिक शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षणाची गुणवत्ता आणि परिणामकारकता तपासण्यासाठी सुरुवातीला पूर्वचाचणी व प्रशिक्षणाच्या शेवटी उत्तरचाचणी घेण्यात आली. सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत चाललेल्या या प्रशिक्षणामध्ये सुलभकांनी अत्यंत प्रभावी, अभ्यासपूर्ण व संदर्भयुक्त पद्धतीने विविध विषयांचे सादरीकरण केले. त्यामुळे प्रशिक्षणार्थी शिक्षकांना बदलत्या शैक्षणिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवी दृष्टी आणि दिशा मिळाली.
या प्रशिक्षणामध्ये विस्तार अधिकारी श्रीमती सविता कचरे मॅडम (राजूर), केंद्रप्रमुख श्री. दीपक बोराडे सर (समशेरपूर), श्री. सचिन वाकचौरे (मुख्याध्यापक, माध्यमिक विद्यालय धामणवन), श्री. शरद तुपविरे (सरस्वती माध्यमिक विद्यालय, राजूर), श्री. संतराम बारवकर , श्रीमती पुष्पा लांडे , श्रीमती सुमन खतोडे (जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा, नवलेवाडी), श्री. सुनील फलके , श्री. हर्षल सोनवणे, श्री. सय्यद , श्री. घोलप साहेब, श्री. कुऱ्हाडे साहेब आदींनी विविध विषयांवर मार्गदर्शन करून प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
या दहा दिवसीय प्रशिक्षणातून शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षण धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, विद्यार्थीकेंद्रित अध्यापन, अध्ययन निष्पत्ती, गुणवत्तापूर्ण शिक्षण, समग्र मूल्यमापन आणि शाळा विकास यांविषयी सखोल समज प्राप्त झाली. तसेच प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीसंदर्भातील आवश्यक प्रमाणपत्र मिळण्यासाठीची कार्यवाही पूर्ण करण्यात आली.
शिक्षक हा केवळ ज्ञानदान करणारा घटक नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाचा शिल्पकार आहे. त्यामुळे शिक्षकांचे सातत्यपूर्ण स्वविकसन, सक्षमीकरण आणि अद्ययावत ज्ञान ही गुणवत्तापूर्ण शिक्षणाची खरी गुरुकिल्ली आहे, हा सकारात्मक संदेश या प्रशिक्षणातून देण्यात आला.
अशा प्रकारे अधिकारी, मार्गदर्शक, २२ सुलभकांची टीम, तंत्रस्नेही शिक्षक आणि प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षक यांच्या सामूहिक सहकार्याने हे दहा दिवसीय प्रशिक्षण अत्यंत नियोजनबद्ध, ज्ञानसमृद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button