सकल कुंभार समाज विकास परिषदेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी उद्योजक श्री राजेंद्र जाधव यांची निवड .

सकल कुंभार समाज विकास परिषदेच्या राज्यव्यापी बैठकीत घोषणा
संजय उकिरडे
आळेफाटा (पुणे) : – उद्योजक श्री राजेंद्र रमेश जाधव यांची सकल कुंभार समाज विकास परिषदेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
हॉटेल ज्ञानेश्वरी, आळेफाटा येथे आयोजित राज्यव्यापी विस्तृत बैठकीत केंद्रीय कार्यकारिणीच्या शिफारसीनुसार, परिषदेचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांच्या हस्ते “श्री संत शिरोमणी गोरोबा काका की जय” च्या जयघोषात त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर ॲड. संजय रुईकर, सुभाष तेटवार, प्रदेश उपाध्यक्ष कल्याण कुंभार, प्रदेश सरचिटणीस रमेश बुरबांडे, प्रदेश उपाध्यक्ष चंदन प्रजापती, प्रदेश संघटक ओमप्रकाश पांडे, प्रदेश सदस्या चंद्रकलाबाई चिकाणे, ह.भ.प. अशोक महाराज कुंभार उपस्थित होते.
प्रदेश सरचिटणीस प्रा. उत्तम मांजरमकर यांनी अभिनंदनपर भाषणात सांगितले की, राजेंद्र जाधव हे रोटरी क्लब, आळेफाटा मेन्सचे संस्थापक अध्यक्ष असून सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण अशा अनेक उपक्रमांमधून समाजातील वंचित व गरजू घटकांसाठी अखंड सेवा कार्य करत आहेत. आळेफाटा व्यापारी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष तसेच जुन्नर, खेड, आंबेगाव व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी व्यापाऱ्यांच्या अनेक समस्या सोडवल्या आहेत.
ऑक्सिएअर गॅसेस इं. प्रा. लि. चे ते मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. तसेच रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट पुणे चे असिस्टंट गव्हर्नर को-ऑर्डिनेटर, ग्राम सुरक्षादल आळेफाटा अध्यक्ष अशा विविध पदांवर काम करण्याचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. त्यामुळे स्व. द.आ. शेठजी, स्व. नंदू अप्पा शिंदे यांच्या कर्मभूमीत राजेंद्र जाधव यांच्या खंबीर नेतृत्वाखाली कुंभार समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या नव्या अध्यायाला प्रारंभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची कृतज्ञता व्यक्त करताना राजेंद्र जाधव म्हणाले, “आपण दिलेली जबाबदारी ही मी ज्या मातीत जन्माला आलो, त्या मातीचे ऋण फेडण्याची अमूल्य संधी आहे. तिचे प्रामाणिकपणे सोने करण्याचा प्रयत्न करेन.”
उद्योजक राजेंद्र जाधव यांची पुणे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल पारंपरिक मूर्तिकार व हस्तकला कारागीर संघाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाठक, दै. महाराष्ट्र संकल्प व मासिक कुंभ विश्व दर्शन चे संपादक दिलीप खांडेकर, हस्तशिल्पी बहुउद्देशीय संस्थेचे सचिव राजाभाऊ रेवडकर व अखिल भारतीय प्रजापती कुंभार समाज संस्थेचे सचिव चंदनलाल प्रजापती यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

