पदमश्री पुरस्कार प्राप्त दोघां दिग्गज भिकल्या धिंडा आणि राहीबाई पोपेरे यांची मुंबईत भेट

अकोले प्रतिनिधी
मुंबईत नुकतेच आदिवासी क्रांती दिनानिमित्त दोन दिग्गज एकत्र आले . पद्मश्री बीजमाता राहीबाई सोमा पोपेरे आणि प्रसिद्ध तारपा वादक पदमश्री भिकल्या धिंडा यांची नुकतेच मुंबई येथे भेट झाली.
आदिवासी क्रांती दिनाच्या निमित्ताने हे दोघेही दिग्गज एका सामाजिक कार्यक्रमानिमित्त मुंबईत एकत्र आले होते.
दोघांनीही एकमेकांना सन्मान देत आपापल्या क्षेत्रातील कार्यामुळे आदिवासी समाजाला एका विशिष्ट उंचीवर बघताना समाधान व्यक्त केले.भिकल्या धिंडा यांनी राहीबाई यांना सन्मान देत त्या करत असलेल्या बीज संकलन आणि गावरान बियाणे प्रचार प्रसार या कामाबद्दल आदर व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.

मी सुद्धा तुमच्या प्रमाणे शाळेत जाऊ शकलो नाही परंतु पारंपरिक आदिवासी वाद्य कला म्हणून प्रसिद्ध असलेल्या तारपा संगीताची बालपणापासून मनापासून सेवा केली. त्यामुळेच पद्मश्री सारख्या पुरस्कारापर्यंत पोहोचता आले याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. कुठलेही काम असो ते मनापासून आणि आवडीने केल्यास नक्कीच समाजात सन्मान प्राप्त होतो यावर दोघांनीही एकमत व्यक्त केले. आदिवासी समाजातील भिकल्या धिंडा यांना भेटण्याची अनेकदा राहीबाई यांनी इच्छा व्यक्त केली होती. अखेर आदिवासी क्रांती दिनाच्या महत्त्वाच्या दिवशी या दोघांची भेट झाल्याने दोघांनीही मनापासून आनंद व्यक्त केला. भिकल्या बाबांकडून राहीबाई यांनी तारपा संगीताचा आनंद लुटला आणि आपल्या बालपणात या संगीताचे मोठ्या प्रमाणावर सन उत्सवात व लग्नकार्यात वापर होत असल्याचे अनुभव आणि आठवण त्यांनी व्यक्त केले. परंतु आजच्या डीजे संस्कृतीमुळे आदिवासी संस्कृती व वाद्य कला लुप्त होत चालल्याची खंत ही या दोघांनी व्यक्त केले. भिकल्या धिंडा यांनी राहीबाई यांच्या कार्याचा गौरव करताना आपल्या समाजासाठी आपण बहुमाना असल्याचे गौरव उद्गार काढले. या दोन महान व्यक्तिमत्वांना एकत्र बघून सर्वांनाच आनंद झाला. आदिवासी समाजाचे बहुमान असलेले हे दोन्ही व्यक्तिमत्व एका मंचावर बघून त्यांच्या विचारांचे सर्वांनी मनोभावे श्रवण केले .
=======



