केंद्रस्तरीय ‘स्पेलिंग बी’ स्पर्धा उत्साहात संपन्न मान्हेरे केंद्रातील १० शाळांचा सहभाग

प्रतिनिधी/ श्री एस. के. जाधव
अकोले तालुक्यातील मान्हेरे केंद्रातील जिल्हा परिषद, अहिल्यानगर प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने आचार्य विनोबा भावे शिक्षक सहायक कार्यक्रम (Open Links Foundation) अंतर्गत आयोजित केंद्रस्तरीय ‘स्पेलिंग बी’ स्पर्धा मान्हेरे केंद्रातील जि. प. प्राथमिक शाळा देवीचीवाडी (लाडगाव), ता. अकोले येथे उत्साहपूर्ण व आनंददायी वातावरणात संपन्न झाली.
मान्हेरे केंद्रातील वाकी, मान्हेरे, आंबेवंगण, लाडगाव, देवीचीवाडी, टिटवी, सोकेवाडी, शेणीत गावठा, डामसेवाडी आणि ठोकळवाडी या दहा शाळांमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. शाळास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांची केंद्रस्तरावर स्पर्धा घेण्यात आली.
जिल्हास्तरावरील मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांचे तीन गट करण्यात आले होते. इयत्ता ३री व ४थी – गट १, इयत्ता ५वी व ६वी – गट २ आणि इयत्ता ७वी व ८वी – गट ३ अशी स्पर्धेची रचना करण्यात आली होती. मा. केंद्रसमन्वयक श्री. राम ओहोळ यांच्या नियंत्रणाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
स्पर्धेच्या महिनाभर आधी प्रत्येक गटासाठी पाठ्यपुस्तकातील २०० इंग्रजी शब्दांची यादी सर्व शाळांना देण्यात आली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांकडून दररोज शाळेत स्पेलिंगचा सराव करून घेण्यात आला तसेच विविध सराव देण्यात आले.
स्पर्धेमध्ये शब्दाचा उच्चार ऐकून त्याचे अचूक स्पेलिंग सांगणे अपेक्षित होते. शब्दाचा अर्थ सांगण्याची आवश्यकता नव्हती. पात्र स्पर्धकांची आद्याक्षरानुसार गोलाकार बैठक व्यवस्था करून प्रत्येकाला गटानुसार एकेक शब्द विचारण्यात आला. बाद पद्धतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेत पहिल्या प्रयत्नात चुकीचे स्पेलिंग सांगितल्यास एक अतिरिक्त ‘लाइफलाईन’ संधी देण्यात आली.

पहिल्या फेरीत सोपे शब्द, त्यानंतर मध्यम व कठीण शब्द आणि शेवटी ‘सरप्राईज शब्द फेरी’ अशा पद्धतीने स्पर्धेची उत्कंठा वाढवत नेण्यात आली. विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साही, निर्भय आणि आनंददायी वातावरणात स्पर्धेत सहभाग घेतला.
🏆 तीनही गटांतील विजेते
गट १ – इयत्ता ३री व ४थी
🥇 प्रथम – जागृती विजय वैराळ, वाकी
🥈 द्वितीय – पायल तुकाराम मधे, लाडगाव
🥉 तृतीय – समिधा राजेंद्र बांबळे, सोकेवाडी
गट २ – इयत्ता ५वी व ६वी
🥇 प्रथम – सम्राट अर्जुन मुंढे, टिटवी
🥈 द्वितीय – रुद्र चंद्रकांत सगभोर, वाकी
🥉 तृतीय – राजश्री आनंदा धोंगडे, शेणीत गावठा
गट ३ – इयत्ता ७वी व ८वी
🥇 प्रथम – सानिका एकनाथ मुंढे, टिटवी
🥈 द्वितीय – मानसी सुभाष धोंगडे, शेणीत गावठा
🥉 तृतीय – निहार दत्तात्रय भांगरे, वाकी
तीनही गटांतील प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
जागृती विजय वैराळ – वाकी – गट १
सम्राट अर्जुन मुंढे – टिटवी – गट २
सानिका एकनाथ मुंढे – टिटवी – गट ३
हे तिन्ही विद्यार्थी दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या तालुकास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
केंद्रस्तरावर प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे कंपासपेटी, इंग्रजी शब्दबुक आणि रंगीत पेन्सिल बॉक्स अशी प्रोत्साहनपर बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

मा. श्री राम ओहोळ, केंद्रसमन्वयक, मान्हेरे यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून तालुकास्तरीय स्पर्धेसाठी मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या. खिरविरे बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी मा. श्री ज्ञानेश्वर माळवे यांनी स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल सर्व आयोजकांचे अभिनंदन केले तसेच यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेसाठी श्री. सुधाकर भांगरे (ठोकळवाडी), श्री. पांडुरंग खाडे (टिटवी), श्री. विठ्ठल कवटे (शेणीत गावठा), श्री. तुकाराम मधे (लाडगाव), श्री. अर्जुन तळपाडे (वाकी) आणि श्री. युवराज तळपे (सोकेवाडी) यांनी पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.
या स्पर्धेचे नियोजन वाकी शाळेचे उपाध्यापक श्री. अर्जुन तळपाडे आणि सोकेवाडी शाळेचे उपाध्यापक श्री. युवराज तळपे यांच्या नियोजनाखाली करण्यात आले. देवीचीवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री. गिरीधर सारूक्ते यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली.
यावेळी श्री. रमाकांत भागडे (मान्हेरे), श्री. सोमनाथ धिंदळे (आंबेवंगण), श्री. देवराम बांडे (टिटवी), श्री. दशरथ सोंगाळ (डामसेवाडी) यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी श्री. दीपक साळवे (देवीचीवाडी) यांनी सर्व स्पर्धक, विजेते विद्यार्थी, उपस्थित शिक्षकवृंद, अधिकारी व पदाधिकारी मान्यवरांचे आभार मानले.



