संगमनेर नगरपरिषदेने दिव्यांगांसाठी दिला 15 लाखाचा निधी !

संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने दिव्यांगांसाठी 15 लक्ष 80 हजार रुपयांचा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आल्याची माहिती डॉ. शशिकांत मंगरुळे , प्रशासक सं.न.पा तथा उपविभागीय अधिकारी संगमनेर व राहुल वाघ मुख्याधिकारी यांनी दिली.
राज्य शासनाच्या वतीने राज्यातील सर्व नगर परिषदांनी दिव्यांगांसाठी 5 टक्के निधी राखून ठेवणे बाबत परिपत्रक काढले असून , या अंतर्गत दिव्यांगांसाठी समान संधी, संरक्षण व समान सहभाग कायद्यानुसार 5 टक्के निधी खर्च करण्याचे निर्देश दिले आहेत . या निधीअंतर्गत दिव्यांगांचे मागणीनुसार त्यांना उदरनिर्वाह, व्यवसाय , साहित्य खरेदी करण्यासाठी सदरचा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करणे बाबत निर्देश केले आहेत डॉ.शशिकांत मंगरुळे , प्रशासक सं.न.पा तथा उपविभागीय अधिकारी व राहुल वाघ मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील 316 दिव्यांग लाभार्थ्यांना प्रत्येकी रुपये 5 हजार याप्रमाणे एकूण 15 लक्ष 80 हजार रुपयांचा निधी बँक खात्यात वर्ग करण्यात आला असल्याचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी सांगितले.
मागील काळात तत्कालीन मा.नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे यांच्या कार्यकालात सदरचा निधी देणे बाबतचा निर्णय घेण्यात आला होता व यापूर्वी निधीचे वाटप करण्यात आले होते. त्यांच्या संकल्पनेतून दिव्यांगांची आर्थिक परिस्थिती पाहता वीज बिलाचा भार पडू नये यासाठी दिव्यांगांना सौरदिवे उपकरण संच प्रदान करण्यात आले होते.तसेच कोव्हीड साथ रोगाच्या काळात आर्थिक अनुदान वाटप करण्यात येऊन वेळोवेळी आर्थिक राखीव निधी प्रदान करण्यात आला होता. त्याच अनुषंगाने दिव्यांगांसाठीचा राखीव निधी बँक खात्यात वर्ग करण्यात आला आहे.दिव्यांगां प्रती सहानुभूती असून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध आहे.यापुढील काळातही दिव्यांगा बाबत नेहमी सकारात्मक विचार करून त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याबाबत काळजी घेऊन वेळोवेळी त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल.असे प्रतिपादन डॉ. शशिकांत मंगरुळे व राहुल वाघ यांनी केले आहे.
दिव्यांगांच्या वतीने प्राप्त झालेल्या निधी बाबत समाधान व्यक्त करून करुन डॉ.शशिकांत मंगरुळे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी व राहुल वाघ मुख्याधिकारी संगमनेर नगर परिषद यांचे आभार मानले.