शेवगाव तालुक्यातील मौजे सोनविहीर येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यांची पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत असून सोनविहीर येथे पाणीपुरवठ्याची स्वतंत्र सोय करा अशा आशयाचे निवेदन अॅड.शिवाजीराव काकडे यांच्या अध्यक्षतेखाली जि.प.सदस्या सौ.हर्षदाताई काकडे यांच्यासह सोनविहीर येथील ग्रामस्थ व महिलांनी शेवगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी .श्री.महेश डोके यांना दिले
. निवेदनात पुढे म्हंटले आहे की, शेवगाव तालुक्यातील मौजे सोनविहीर या गावाचा हातगाव सह २८ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजेनेत समावेश आहे. परंतु ही योजना गेल्या १५ वर्षापासून रखडलेलीच आहे. त्यामुळे ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड प्रमाणात गैरसोय आहे. मध्यंतरी मुंगी येथून रुर्बन योजेनेखाली पाणीपुरवठा करण्याचे ठरले होते. तथापि पाईपची दरवाढ झाल्याने ठेकेदाराने हे काम केलेले नाही. त्यामुळे रुर्बन योजनेतून देखील ग्रामस्थांना पाणी मिळू शकले नाही. पिण्याच्या पाण्याअभावी ग्रामस्थ प्रचंड त्रासलेले आहेत. महिलांना पाण्यासाठी इतरत्र पायपीट करावी लागत आहे. मौजे सोनविहीर गावातील ग्रामस्थांना हातगाव सह २८ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजेनेत राहावयाचे नसल्याबाबतचा ठरावही ग्रा.प.ने दिलेला आहे. तरी सोनविहीरचा बोधेगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेत समावेश करून गावासाठी स्वतंत्र पाण्याची सोय करावी अन्यथा ग्रामस्थ पाण्यासाठी रस्त्यावर उतरून हंडा मोर्चा करतील असेही निवेदनात म्हंटले आहे. निवेदनावर आबासाहेब काकडे, रामकिसन विखे, काशिनाथ डोंगरे, अंकुश गर्जे, श्रीराम विखे, मनोहर विखे, यांच्यासह निर्मला काकडे, कल्पना काकडे, द्वारका पहिलवान, शशिकला अवचित्ते, रफिया शेख, कडूबाई विखे, मंडन अवचित्ते, लंका विखे, सुमित्रा शिंदे, अनिता विखे, आशा विखे, लता विखे, रहिबाई विखे आदि महिला व ग्रामस्थांच्या सह्या आहेत.