संस्कारांचा वारसा आणि गुरुमहिमा संत साहित्यातून कळतो : डॉ . सुनील शिंदे .

अकोले येथे कन्या विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी
अकोले : प्रतिनिधी
‘ विश्वमाउली संत ज्ञानदेवांनी गुरुमहिमा समजावून दिला , तर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी आदरभाव अन् आस्था शिकवली . महाराष्ट्रातील संत विचारांची परंपरा संत गाडगेबाबांपर्यंत समृद्धपणे प्रेरक – मार्गदर्शक ठरली आहे ‘ असे प्रतिपादन डॉ . सुनील शिंदे यांनी केले . कन्या विद्यामंदिर , अकोले येथे आयोजित गुरुपौर्णिमा कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते . अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बी . एच् . पळसकर होते .
गुरुविषयक थोरवी आणि भारतीय परंपरा यातील नाते समजावून देताना डॉ . सुनील शिंदे म्हणाले , ‘ श्रीरामकृष्ण परमहंस आणि नरेन्द्र दत्त उर्फ स्वामी विवेकानंद यांची आदर्श गुरु शिष्य जोडी विश्व विख्यात ठरली . तळमळ आणि आत्मियतेचा ओलावा विवेकानंद यांनी जपला . संत चित्कळा मुक्ताबाईने परखड वाणीतून गुरु महिमा जगाला शिकवला तर निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी शेतीवाडी , पाखरांच्या – मुक्या जीवांच्या प्रतिमांमधून मानवतेचा धर्म शिकवला ! सावित्रीबाई फुले यांच्या जगण्या वागण्यातून तसेच शिक्षणविषयक तळमळीतून क्रांती घडली . ‘ बडा बिकट जमघाट । गुरुबीन कौन बताए बाट । ‘ असे सांगणाऱ्या संत कबीरांचे चरित्र प्रेरणादायी आहे . पूज्य साने गुरुजींच्या ‘ श्यामची आई ‘ पुस्तकाने भावनेचा इतिहास निर्माण केला . संस्कारांचा वारसा आणि गुरुमहिमा संत साहित्यातून कळतो ‘
विनम्रता आणि आदराची भावना आयुष्यात फार गरजेची असल्याचे सांगून मुख्याध्यापक भीमाजी पळसकर यांनी अध्यक्षीय मनोगतात गुरुविषयक कृतज्ञतेचे संदर्भ समजावून दिले .
कार्यक्रमाच्या औचित्याने डॉ . सुनील शिंदे यांनी त्यांच्या विविध विषयांशी संबंधित पुस्तकांचा संच मुख्याध्यापक भिमाजी पळसकर यांचेकडे सुपूर्त करुन शालेय वाचनालयास भेट दिला . शालेय परिसरात याप्रसंगी वृक्षारोपण करण्यात आले . कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे स्वीकृत विश्वस्त एम् . डी . सोनवणे , मुख्याध्यापक बी . एच् . पळसकर , शिक्षिका मंगल कर्पे , श्रीमती सहाणे , श्री . पाबळकर यांच्यासह अन्य शिक्षिका , विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते . कु . प्रांजली धुमाळ हिने सूत्रसंचालन केले . —————————————