इतर
माजी मंत्री गडाखांच्या कृतज्ञतेने नेवासा तालुका भारावला!

(विजय खंडागळे)
सोनई दि १६
ज्यांना भरभरुन दिले त्यां कथित निष्ठावानांनी 'कृतघ्न' होत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी केलेली प्रतारणा उभा महाराष्ट्र अवाक होऊन पाहत असताना साखर पट्ट्यातील व जिल्हयातील मोठं प्रस्थ समजल्या जाणाऱ्या यशवंतराव गडाख यांचे पुत्र माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी त्यांच्याप्रती दाखविलेल्या ' कृतज्ञ' तेने नेवासा तालुका मतदारसंघातील आम जनता पुरतीभारावून गेली
त्यांच्या या भुमिकेने तालुक्याची मान निश्चितच राज्यात उंचावल्याची अभिमानास्पद चर्चा सोशल मिडीयावर चांगलीच रंगली आहे.
मागील महिनाभरापासून राज्यातील सत्ता संघर्षाने राज्यातील जनता श्वास रोखुन या घडामोडी पहात असतानाच स्वप्नातही कोणी कल्पना केली नसेल अशा गोष्टी घडताना 'याची देही याची डोळा' अनुभवयास मिळाल्या.
एकेकाळी रिक्षा चालवणारे एकनाथ शिंदे, पानटपरी चालविणारे गुलाबराव पाटील यांच्यासारखे कट्टर, हाडाचे शिवसैनिक पक्षप्रमुख तसेच शिवसेनेशी कधी काळी प्रतारणा करु शकतील, असे भाकीत यापूर्वी कोणी वर्तवले असते तर एक तर त्याला वेड्यात काढले गेले असते. याउलट प्रामुख्याने काँग्रेस राष्ट्रवादीच्या मुशीत तयार झालेले कथित साखर, सहकार, शिक्षण सम्राटांनी राजकीय सोयीसाठी शिवसेनेत प्रवेश करुन सत्तेची पदे उपभोगल्यानंतर सोयीस्करपणे सोडचिठ्ठी देत स्वगृही परतल्याची असंख्य उदाहरणे आहेत. परंतु या खेपेला सारीपाटाचा खेळच उलटा पडल्याचे दिसून आले. महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या नावाखाली मूळचे शिवसैनिक समजल्या जाणाऱ्या निष्ठावंत लोकप्रतिनिधींनी सत्तेसाठी चक्क पक्ष व पक्षप्रमुखांशीच प्रतारणा करत मोठ्या संख्येने सवतासुभा उभा केल्याने सामान्य शिवसैनिक हबकून गेल्याचे दिसून आले. अगदी, याप्रकारामुळे टीव्हीवर अश्रु ढाळून दुःख व्यक्त करणारे काही लोकप्रतिनिधी नंतर बंडखोरांच्या गोटात साळसुदपणे डेरेदाखल झाल्याचे पाहून तर राजकारण नक्की काय चालू आहे? याचा विचार करुन राजकीय धुरीणांचेही डोके गरगरायला लागले नसेल तरच नवल.
या सत्ता संघर्षात शिवसेनेचा पुरता गेम झाल्याचे चित्र दिसून येत असताना मूळचा काँग्रेस राष्ट्रवादीचा राजकीय पिंड असलेल्या राज्याचे जलसंधारण मंत्री व अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांच्या भुमिकेकडे राज्याचे लक्ष लागले होते. काँग्रेस-राष्ट्रवादीशी त्यांची असलेली नाळ लक्षात घेता व त्यांना राजकीय दृष्ट्या सोईस्कर असल्याने तेही भविष्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकतर स्वगृही तरी परततील किंवा सत्तेच्या आमिषाने शिंदे फडणवीसांच्या नव्या राजकीय समिकरणांशी तरी जुळवून घेतील, अशी अटकळ बांधण्यात येत होती. किंबहुना त्यांच्या अशा प्रकारच्या निर्णयाची केवळ औपचारिकताच बाकी असल्याचे दावे केले जात होते. विशेषतः नेवासा तालुक्यातील जनतेमध्ये आमदार गडाख यांच्या पुढील राजकीय वाटचालीसंदर्भात कमालीची उत्कंठा दाटून राहिल्याचे दिसून येत होते.
काही तासतच ठिकाण बदलले तरी कार्यकर्त्यांची गर्दी
कार्यकर्त्यांना सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एक ठिकाण ठरले होते, पण अचानक पावसाचे वातावरण पाहता,काही तासात ठिकाण बददले तरीही कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती.
राज्यातील संपूर्ण राजकीय चित्र स्पष्ट झाल्यानंतर आपल्या मतदार संघातील लोकांची सुरु असलेली घालमेल संपुष्टात आणण्याची गरज वाटल्यावरुन त्यांनी भुमिका स्पष्ट करण्यासाठी नुकताच सोनईत मेळावा घेतला. अत्यंत अल्प सूचनेवर पावसाचे वातावरण असल्याने ऐनवेळी मेळाव्याचे ठिकाण बदल्यात येऊनही सोशल मिडीयावरुन आवाहन करुनया मेळाव्याला उपस्थित प्रचंड गर्दी पाहता आमदार गडाख यांच्या निर्णयाची तालुक्याला किती उत्सुकता होती ते लक्षात येते. अखेर त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळेच तालुक्याला राज्य मंत्रीमंडळात पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रीपदाच्या रुपाने प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाल्याची कृतज्ञता व्यक्त करुन "जिसे हराने में सारी दुनिया एक हो चुकी है, उसे अकेला कैसे छोड़ दूं' अशा शेर शायर करून माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची पाठराखण करत नडगमगता भक्कमपणे पाठीशी उभे राहण्याचा निर्णय जाहीर केला. निष्ठावंतांनी कृतघ्न होत ठाकरे यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याचा विडा उचलल्याचे स्पष्ट दिसत असतानाही केवळ पहिल्यांदा मोठी राजकीय संधी दिल्याची कृतज्ञता ठेवून आमदार गडाख यांनी त्यांच्या अवघड परिस्थितीतही पाठराखण करण्याचा निर्णय जाहीर केल्याने राजकीय जाणकारांनाही मोठा धक्का बसला आहे.
तर दुसरीकडे राजकीय घोडेबाजारात हात धुवून घेण्याची स्पर्धा सुरु असताना तसेच मोठी संधी असतानाही ती नाकारुन तत्वाशी बांधिलकी मानणारे नेतृत्व आपल्याला लाभले याचा सार्थ अभिमान कार्यकर्त्यांसह सामान्य जनांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहताना दिसत आहे.
सत्तेला न चिकटून बसणारा लोकप्रतिनिधी
ठाकरे मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाचे महत्त्वाचे पद मिळाले, पण त्या पदाचा कोणताही गर्व न ठेवता,जनतेसाठी जमिनीवरच असल्याचे साधी राहणीमान ठेऊन राज्यस्तरावर एकमेव लोकप्रतिनिधी माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा समावेश होतो.