मातीचे आरोग्य जपा तरच माती आपल्याला जगवेल…..डॉ.संभाजी नालकर…

रासायनिक निविष्ठांचा भरमसाठ वापराने जमीन खराब होत आहे.
राजूर /प्रतिनिधी
एसके फाउंडेशन मुंबई पुरस्कृत व बायफ संचलित समृद्ध किसान प्रकल्प आणि जनरल मिल्स पुरस्कृत आदिवासी विकास प्रकल्प तसेच कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने मृदा परीक्षण आणि मृदा आरोग्य जागृती कर्यक्रम चिचोंडी ता अकोले येथे पार पडला
चीचोंडी येथे प्रकल्पातील महिला शेतकरी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. या कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर चे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर , मृदा शास्त्रज्ञ एस. एस. सोनवणे , बायफचे विभागीय अधिकारी जितीन साठे , हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
मार्गदर्शनपर भाषणात डॉ संभाजी नालकर यांनी उपस्थितांना मातीचे आरोग्य टिकवण्यासाठी पशुधन आणि जंगल यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दोन्ही गोष्टी आदिवासी भागात टिकवून आहेत तोपर्यंत इथली मृदा सकस आणि उपजाऊ राहणार आहे. त्यामुळे जंगल आणि पाळीव प्राणी या दोन्हींचाही संगोपन करा असा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला. आज आपण मातीची काळजी घेतली तरच उद्या आपण जीवन नीटपणे जगू , मातीचा घसरत चाललेला कस आणि सेंद्रिय कर्ब ही चिंतेची बाब आहे असे त्यांनी नमूद केले. पाण्याचा अतिरिक्त वापर तसेच सेंद्रिय कर्ब आणि आम्ल- विम्ल निर्देशांक बिघडला आहे. एकेकाळी शंभर टन उसाचे उत्पन्न काढणारा शेतकरी 15 टन उत्पादन काढणे कठीण झाले आहे. ही सर्व अधोगती केवळ रासायनिक आणि सेंद्रिय याचा सुवर्णमध्य न साधल्यामुळे झालेली आहे. यातून बाहेर येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कंपोस्ट खतांचा वापर वाढवून रासायनिक खतांचा वापर कमी करण्यावर भर दिला पाहिजे .असे प्रतिपादन त्यांनी केले. जितीन साठे यांनी आपल्या प्रास्ताविकात या भागातील जमिनींचा पोत अद्याप टिकून आहे व त्याचे मोठे श्रेय आदिवासी बांधवांनी अबाधित राखलेल्या जंगलांना जाते. जंगल संपत्ती विपुल प्रमाणात असल्यामुळे पिकांना लागणाऱ्या अन्नद्रव्यांचा साठा जंगलातून निर्माण होणाऱ्या दर्जेदार कंपोस्ट खतातून उपलब्ध होतो. त्यामुळे जमिनीतील जिवाणूंची संख्या मुबलक प्रमाणात अस्तित्वात राहते. त्यातूनच इथली शेती उत्पादने दर्जेदार व रोग व किडींना कमी बळी पडतात .अशा शेतमालाला अधिक बाजार भाव मिळणे आवश्यक आहे. ज्येष्ठ मृदा शास्त्रज्ञ एस. एस .सोनवणे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना जैविक शेतीवर भर देण्याचे आवाहन केले. आधुनिकीकरणामुळे शेती करण्याच्या पद्धती बदलल्या. दरम्यानच्या काळात पशुधन कमी होत गेले व शेतीला मुबलक प्रमाणात मिळणारे कंपोस्ट खत हळूहळू कमी होत गेले . रासायनिक शेतीचा प्रचार आणि प्रसार गेली तीस -चाळीस वर्ष मोठ्या प्रमाणावर झाला .रासायनिक शेती करताना रासायनिक निविष्ठांचा अतिवापर करण्यात आला .त्यातून पंजाब , हरियाणा सारखे राज्य मोठ्या प्रमाणावर जमिनीचे आरोग्य गमावून बसले आहेत.आपण वेळीच सावध झालो नाही तर पुढील पिढीसाठी कसन्या योग्य जमीन उरणार नाही.जमिनीचा पोत सांभाळत सेंद्रिय कर्ब अबाधित राखत शेती करणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. आपल्याला काही परंपरागत गोष्टींना सोबत घेत पुन्हा एकदा शाश्वत शेतीकडे वळावे लागणार आहे .त्यासाठी एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब होणे गरजेचे आहे. शेती करताना पाळीवप्राणी जसे की शेळी ,मेंढी ,कोंबडी या सर्वांचे महत्व आहे. यांच्याशिवाय जमीन सुपीक ठेवणे अवघड आहे. पाळीव प्राण्यांच्या म मूत्रातून निर्माण होणारे कंपोस्ट म्हणजे शेतीसाठी संजीवनी ठरते. जमिनीचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या निविष्ठांना फाटा देत घरच्या घरीच निविष्ठा बनवण्याचे तंत्र अवगत केले पाहिजे. जीवामृत, बीजामृत, गांडूळ खत ,गांडूळ पाणी , हिरवळीचे खते, पिकांची फेरपालट, हवेतील नत्र शोषून करणाऱ्या पिकांच्या लागवडी यासारखे तंत्र शेतकऱ्यांनी अवलंबले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

ज्येष्ठ सेंद्रिय शेती तज्ञ व प्रसारक संपतराव वाकचौरे यांनी सेंद्रिय शेती व जमिनीचे आरोग्य यांचा किती जवळचा संबंध आहे हे त्यांच्या उदाहरणातून पटवून दिले .त्यांनी सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा घरच्या घरी तयार करून शेती उत्पादनावर होणारा खर्च आटोक्यात आणला याचे उदाहरण सर्वांसमोर मांडले. गांडूळ खत, गांडूळ पाणी ,दशपर्णी अर्क , जीवामृत, बीजामृत , कंपोस्ट खत याबद्दल त्यांनी सखोल माहिती दिली. कार्यक्रमाचे नियोजन बायफचे प्रकल्प समन्वयक विष्णू चोखंडे , शुभम नवले , राम कोतवाल , मच्छिंद्र मुंडे, किरण आव्हाड , गोरख देशमुख ,सुनील मधे , यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम कोतवाल यांनी केले .