इतर

प्रतिभासंपन्न संगीतकार सतीशचंद्र मोरे यांचे प्रदीर्घ आजाराने निधन!

वैशाली सामंत, अवधूत गुप्ते, साधना सरगम, सुरेश वाडकर, कैलाश खेर, शान, शंकर महादेवन, स्वरूप खान, आनंदी जोशी आणि नेहा कक्कर अशा अनेक दिग्गज गायकांसोबत सतीशचंद्र मोरे यांनी काम केले

मुंबई, प्रतिनिधी (९ डिसेंबर २०२५) :
विद्रोही कवी पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या कवितांना प्रभावीपणे संगीतबद्ध करण्याची विलक्षण क्षमता असलेले, तसेच वैशाली सामंत, अवधूत गुप्ते, साधना सरगम, सुरेश वाडकर, कैलाश खेर, शान, शंकर महादेवन, स्वरूप खान, आनंदी जोशी आणि नेहा कक्कर व इतर अनेक दिग्गज गायकांसोबत काम केलेले जेष्ठ आणि हरहुन्नरी संगीतकार सतीशचंद्र दत्तात्रय मोरे यांचे प्रदीर्घ आजाराने नुकतेच माउंट मेरी चर्चजवळील ‘शांती आवेदना’ येथे निधन झाल्याचे त्यांच्या स्नेही तृप्ती करलकर यांनी कळविले आहे.

सतीशचंद्र हे ५६ वर्षांचे होते. निस्वार्थी, दिलखुलास आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून ते संगीतक्षेत्रात ओळखले जात. त्यांच्या निधनाने संगीतविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सतीशचंद्र मोरे यांनी सुरुवातीला अपना बँक येथे नोकरी केली होती. त्यांना टाटा कंपनीकडूनही नोकरीची संधी मिळाली होती; मात्र संगीताची प्रबळ ओढ असल्याने त्यांनी ती संधी स्वीकारली नाही आणि पूर्णवेळ संगीतक्षेत्रातच कार्य करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या वडिलांना हार्मोनियम आणि मेंडोलिन वादनाची आवड होती. त्याचा प्रभाव म्हणूनच सतीशचंद्र यांनीही संगीताची दिशा निवडत वडाळ्यातील ज्ञानेश्वर विद्यालयात संगीत शिक्षक आणि कार्यक्रम संचालक म्हणून काम केले. त्यांनी अनेक दूरदर्शन मालिकांसाठी शीर्षक गीतं तसेच जाहिरातींची जिंगल्स तयार केली आहेत.

संगीतकार म्हणून आपल्या स्वतंत्र ओळखीचा शोध घेताना त्यांनी मोठा संघर्ष केला. ‘मयूरपंख’ या नावाने स्वतःचा वाद्यवृंद सुरू करून अनेक कार्यक्रम सादर केले. सर्वात प्रथम त्यांनी लेस्ली लुईस चा प्रायव्हेट अल्बम केला होता. त्यानंतर पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या काव्याला चाल देण्याचे जिकिरीचे काम त्यांनी समर्थपणे पार पाडले आणि त्यानंतर संगीतकार म्हणून सुरु झालेला प्रवास त्यांच्या आयुष्याला कलाटणी देऊन गेला. भावगीत, भक्तिगीत, पॉप, जॅझ, हळुवार प्रेमगीते ते आयटम साँगपर्यंत—अशा विविध शैलींमध्ये त्यांनी सहजतेने संगीत दिले. जवळपास २५ वर्षांहून अधिक काळ ते संगीतदिग्दर्शनाच्या क्षेत्रात सक्रिय होते.

लाख मोलाची गोष्ट’, ‘आम्ही बोलतो मराठी’, ‘या गोल गोल डब्यातला’, ‘मी नाही हो त्यातला’, ‘सेकंड इनिंग’ अशा अनेक चित्रपटांना तसेच आनंद लोंढे यांच्या जास्विन प्रॉडक्शन्स निर्मित आगामी ‘लव्हेरिया’ चित्रपटाला त्यांनी संगीत दिले आहे. “या गोल गोल डब्यात” मध्ये अशोक सराफ यांच्या कडून शीर्षक गीत गाऊन घेण्याची कला त्यांनी साधली होती. त्यांच्या संगीतबद्ध काव्यसंग्रहांमध्ये नामदेव ढसाळ यांचे ‘तृष्णा’, ‘बहर प्राजक्ताचा’, ‘मित’, तसेच जास्विन म्युझिकसाठी केलेले ‘धीमा धीमा’ शिवजयंती विशेष ‘शिवबाची तलवार’ आणि ‘प्रेम एक तरल भावना’ हे विशेष उल्लेखनीय आहेत. याशिवाय आनंद म्हसवेकर लिखित ‘सुनेच्या राशीला सासू’, ‘मदर्स डे’ व ‘एक्सक्यूज मी प्लीज’ या नाटकांनाही त्यांनी संगीत दिग्दर्शन केले होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button