वडगाव सावताळ येथे गोशाळेचे उद्घाटन: भाऊसाहेब शिंदे यांच्या वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

गोशाळेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न : माजी सरपंच भाऊसाहेब शिंदे
पारनेर/प्रतिनिधी :
सामाजिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात आपल्या नेतृत्वाने विशेष छाप पाडणारे माजी सरपंच भाऊसाहेब (बी. डी. दादा) शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वडगाव सावताळ येथील तरटीफाटा येथे मुक्या जनावरांच्या सेवेसाठी गोशाळेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले
. माजी सरपंच ह.भ.प. बाबासाहेब महाराज शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या गोशाळेच्या उद्घाटन सोहळ्याला सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि मान्यवरांची मोठी उपस्थिती होती.या प्रसंगी भाऊसाहेब शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, “माझ्या वाढदिवसाचा हा सोहळा सामाजिक कार्याने साजरा होत असल्याने मला अत्यंत आनंद होत आहे. गोशाळेची निर्मिती ही केवळ मुक्या जनावरांच्या संरक्षणासाठीच नाही, तर गावाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांना पुढे नेण्याचा एक प्रयत्न आहे. ह.भ.प. बाबासाहेब महाराज शिंदे यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांनी दाखवलेला उत्साह आणि सहकार्य कौतुकास्पद आहे. ही गोशाळा गावातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरेल आणि मुक्या जनावरांच्या कल्याणासाठी एक मैलाचा दगड ठरेल.”सोहळ्याला सामाजिक कार्यकर्ते मोहनराव रोकडे, बाबासाहेब लोखंडचूर, प्रेमानंद महाराज आंबेकर, अर्जुन शेठ रोकडे, उत्तर प्रदेश ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक योगेश लोखंडचूर, मंगेश रोकडे, ह.भ.प. गोरक्ष महाराज रोकडे, भाऊसाहेब रोकडे महाराज, भाऊ शिंदे, पोपट सरोदे, माजी सरपंच छायाताई शिंदे, साखराबाई शिंदे, सुनील शिंदे, कुणाल शिंदे, भाऊसाहेब दाते सर, निवृत्ती शिंदे, गुलाब रोकडे यांच्यासह वडगाव सावताळ येथील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी भाऊसाहेब शिंदे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.गोशाळेच्या उद्घाटनाने गावात एक नवीन सामाजिक जाणीव निर्माण झाली आहे. ही गोशाळा मुक्या जनावरांसाठी आश्रयस्थान तर ठरेलच, शिवाय गावातील तरुणांना सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी प्रेरणा देईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. भाऊसाहेब शिंदे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानत गावाच्या विकासासाठी आणि सामाजिक कल्याणासाठी अशा उपक्रमांना पुढेही प्राधान्य देण्याचा संकल्प व्यक्त केला.