इतर
पारनेर शहरात डॉ.आंबेडकरांच्या स्मारकासाठी 2 कोटींचा निधी लंकेनी केली मागणी

आमदार नीलेश लंके यांची केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे मागणी
दत्ता ठुबे
पारनेर : प्रतिनिधी
पारनेर शहरातील प्रभाग९ मध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुसज्ज स्मारक उभारण्यासाठी दोन कोटींच्या निधीची मागणी आमदार नीलेश लंके यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे केली.
आ. लंके यांनी मुंबईत मंत्री आठवले यांची भेट घेऊन स्मारकासाठीच्या निधीची मागणी केली. मंत्री आठवले यांनी आ. लंके यांचे निवेदन स्विकारून लवकरच हा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली होती. दरम्यान, यापूर्वी आ. लंके यांनी नवी दिल्ली येथे मंत्री आठवले यांची भेट घेऊन विविध योजनांसाठी निधीची मागणी केली होती. त्याच वेळी पारनेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी निधी देण्याची ग्वाही आठवले यांनी दिली होती. आठवले यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे आ. लंके यांनी स्मारकासाठीच्या निधीचा प्रस्ताव मंत्री आठवले यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान सुपूर्द केला.
आ. लंके यांनी सांगितले की, महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पारनेर शहरात सुसज्ज स्मारक उभारण्याची आपली संकल्पना होती. त्यासाठी केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करण्यासाठी आपण यापूर्वीच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन साकडे घातले होते. मंत्री आठवले यांनीही कोणतेही आढेवेढे न घेता निधी देण्याचे मान्य केले. त्यानुसार त्यांची मुंबईत भेट घेऊन निधीचा प्रस्ताव सादर केला. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी पुढाकार घेतल्याबद्दल प्रभाग ९ च्या नगरसेविका हिमानी नगरे यांनी आ. नीलेश लंके यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.