पंचायत राज समितीपुढे टँकर घोटाळ्याची तक्रार करणार ….

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यातील नुकताच उघड झालेला टँकर घोटाळा व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांतील गैरव्यवहार याबाबत पंचायत राज समितीपुढे तक्रार कथन करण्यासाठी समितीची वेळ लोकजागृती सामाजिक संस्थेने मागवली आहे .
याबाबतचे पत्र विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आले आहे . अहमदनगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी राज्य विधान मंडळाची पंचायत राज समिती
( पीआरसी ) नगर जिल्हा दौर्यावर येत आहे .
त्या पार्श्वभुमिवर सदर घोटाळ्याबाबत समितीपुढे तक्रार करण्यात येणार आहे . नुकताच उघड झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील टँकर घोटाळ्याबाबत व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांतील गैरव्यवहार याबाबत तक्रार समितीपुढे कथन करण्यात येणार आहे . त्यासाठी समीतीचा काही वेळ राखीव ठेवण्यात यावा अशी मागणी प्रशासनाकडे लोकजागृतीच्या वतीने करण्यात आली आहे . टॅकर घोटाळा दडपण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील प्रशासनातील काही अधिकारी यासाठी प्रयत्नशील असल्याचे निदर्शनास आले असून त्याबाबत पंचायत राज समिती समोर आमच्याकडे असलेले पुरावे सादर करायचे आहेत . तरी त्यासाठी आम्हाला वेळ मिळावा व यासाठी आपण समितीच्या नियोजित कार्यक्रम पत्रिकेत वेळेची तशी तरतूद करावी . अशी मागणी या पत्रात केली आहे .
आमच्या या मागणीचा विचार न केल्यास संघटनेचे कार्यकर्ते समितीच्या दौऱ्यादरम्यान लोकशाही मार्गाने सत्याग्रह आंदोलन करतील असा इशारा देखील देण्यात आला आहे असे लोक जागृती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रामदास घावटे यांनी सांगितले.