मा.आमदार कर्डिलें वर गुन्हा दाखल करण्याची मागणी

अहमंदनगर : खुलेआम कायदे मोडण्याची भाषा करत दमदाटीने हातपाय तोडण्याची धमकी देणारे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यावर जर त्वरित कायदेशीर कारवाई करून दखलपात्र गुन्हा दाखल करावा, अन्यथा महाविकास आघाडी तीव्र आंदोलन करेल, असा इशारा महाविकास आघाडीच्या वतीने आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देतांना दिला.
माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे सुवेंद्र गांधी यांना दमदाटी करणारे मोबाईल फोन कॉल रेकोर्डिंग व्हायरल झाल्यावर याचा आधार घेत आ.प्राजक्त तनपुरे यांनी बुऱ्हाणनगरच्या तुळजाभवानी मंदिराचे पुजारी अॅड.अभिषेक भगत यांनाही शिवाजीराव कर्डिले यांनी केलेल्या दमदाटी बद्दल आज पोलीस अधिक्षक राकेश ओला यांना निवेदन देवून त्यांच्यावर कडक कारवाई करावी या मागणीचे निवेदन महाविकास आघाडीच्या वतीने दिले.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा.शशीकांत गाडे, कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्षा किरण काळे, जी.प.सदस्य शरद झोडगे, माजी उपाध्यक्ष प्रताप शेळके, बाळासाहेब हराळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रोहिदास कर्डिले, ज्येष्ठ नेते किसनराव लोटके, युवा सेनेचे प्रमुख विक्रम राठोड, माजी महपौर अभिषेक कळमकर, केशव बेरड, योगीराज गाडे, दशरथ शिंदे, निखील शेलार, रामेश्वर निमसे, अनिस चुडीवाल आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आ.प्राजक्त तनपुरे म्हणाले, अनेक वर्ष आमदार असलेले व कायदेमंडळात काम केले अशा सध्याच्या राज्यातील सत्ताधारी भाजपचे माजी आमदार असलेल्या व्यक्तीने कायद्याचा अनादर करून कायद्याला न लेखात दोन चार केसने आम्हला काहीही फरक पडत नाही, अशी कायद्याला कुठेच जुमानता अनादर करणारी भाषा जर बोलत असतील तर समाज मनावर याचा मोठा परिणाम होवू शकतो. कायदेमंडळात काम केलेल्या माजी आमदाराला दमदाटी करून भाजपातील माजी खासदार पुत्राला फोन वर धमकी देत हात पाय तोडण्याची अरेरावीची भाषा करत आहे.
सत्ताधारी भाजपाचे पदाधिकारी पूर्ण राज्यात अशीच भाषा करत आहेत. त्यामुळे हे कायद्याचे राज्य आहे का ? असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. बुऱ्हाणनगरचे अॅड.अभिषेक भगत यांच्यावारही या माजी आमदाराने अन्याय केला आहे. बुऱ्हाणनगरच्या मंदिराचा प्रश्न अजून न्यायप्रविष्ट आहे. अद्याप कोणताही निर्णय कोर्टाने दिलेला नसताना या माजी आमदाराने त्यांच्या घरावर शंभर सव्वाशे माणसे पाठवून तेथे दमदाटी व शिवीगाळ केली आहे. त्यामुळे या राज्यात सर्वसामान्य नागरिक सुरक्षित नाही.
सत्तेत आल्यावर कायद्याला जुमायाचे नाही, अशीच परिस्थिती पूर्ण राज्यात असून भाजप सत्तेचा दुरुपयोग करत आहे. यांची गुन्हेगारी प्रवृत्ती आजची नाहीये. आजपर्यंत कित्तेक गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. जर सत्ताधारी खुलेआम कायदे मोडण्याची भाषा करत असतील व त्यांच्यावर कोणतीच कारवाई न करता गुन्हा दाखल होत नसेल तर सर्वसामान्यांचा कायद्यावरील विश्वास उडेल. यासाठी अशा प्रवृत्तीवर कडक शासन व्हावे, त्वरित गुन्हा दाखल करावा यसाठी जिल्हा पोलीस अधिक्षकांना महाविकास आघाडीच्या वतीने निवेदन दिले आहे. याबद्दल येत्या अधिवेशनातही आवाज उठवणार असून तारांकित प्रश्न उपस्थित करणार आहे.
यावेळी पोलीस अधिक्षक राकेश ओला पोलिसांची चौकशी चालू आहे. सीसीटीव्हीचे फुटेज व मोबाईल रेकॉर्डिंग तपासले जात असून लवकरच योग्य कारवाई करू असे आश्वासन दिले. यावेळी विक्रम राठोड, किरण काळे, बाळासाहेब हराळ यांनी माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यावर यापूर्वी दाखल गुन्ह्यांची माहिती पोलीस अधीक्षकांना दिली.