इंटरॅक्ट क्लबचा पदग्रहण उत्साहातरोटरी क्लबमुळे जीवन आनंददायी होईल – उद्योजक शशिकांत पारख

नाशिक : रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या अंतर्गत असलेल्या नाशिक महानगरमधील ३० इंटरॅक्ट क्लबचा पदग्रहण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. संस्थेच्या गंजमाळ येथील सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना नवचैतन्य मिळाले. सुमारे १२० पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ यावेळी झाला.
शालेय विद्यार्थ्यांच्या नेतृत्वगुणांना वाव मिळावा तसेच शालेय जीवनातच सामाजिक बांधिलकी कशी जोपासावी हे समजण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या माध्यमातून शाळा स्तरावर इंटरॅक्ट क्लब स्थापन केले जातात. रोटरीचे उपाध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते शशिकांत पारख या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर रोटरीचे अध्यक्ष सीए प्रफुल बरडिया, सचिव ओमप्रकाश रावत, इंटरॅक्ट संचालक कीर्ती टाक आणि सुचेता महादेवकर होते.
प्रारंभी दमयंती बरडिया यांनी स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. विज्डम हायस्कूलच्या सारा पिंपरीकर हिने नृत्याच्या माध्यमातून गणेश वंदना सादर केली. यावेळी बोलताना रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष सीए प्रफुल बरडिया यांनी इंटरॅक्ट क्लबमधील विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात याचा उपयोग कसा होतो याची माहिती दिली. इंटरॅक्ट संचालक सुचेता महादेवकर यांनी इंटरॅक्ट क्लबमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव कसा देता येतो, याबद्दल मार्गदर्शन केले. रोटरीची फोरवे टेस्ट आणि रोटरी इंटरनॅशनलच्या सात महत्त्वाच्या काम करणाऱ्या विभागांसाठी इंटरॅक्ट क्लब कसे मदत करतात याविषयी सांगितले. इंटरॅक्ट संचालक कीर्ती टाक यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे प्रत्येक शाळेच्या इंटरॲक्ट क्लबच्या पदाधिकारी व समन्वयकास व्यासपीठावर पाचारण केले. अध्यक्ष, सचिव आणि प्रमुख पाहुणे यांनी विद्यार्थ्यांना कॉलर आणि बॅचेस प्रदान केले. या कार्यक्रमात मागील वर्षात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध शाळांचा, शिक्षकांचा आणि इंटरॅक्ट क्लबच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून शिक्षकांचा यथोचित सन्मानही करण्यात आला.
रोटरीचे उपाध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योजक शशिकांत पारख यांनी इंटरॅक्ट क्लब हे एक प्रभावी माध्यम असल्याचे सांगून, या माध्यमातून तुम्ही समाजाच्या उपयोगी कार्यक्रम कसे करावे याचे विवेचन केले. शाळेच्या व रोटरीच्या मार्गदर्शनामुळे जीवन आनंददायी होईल असे सांगितले. त्याचप्रमाणे करिअर मंथन चेअर विक्रम बालाजीवाले यांनी करिअरच्या दिशा कशा स्पष्ट केल्या जाणार आहेत हे सांगितले. सायबर सिक्युरिटी चेअर राजेश्वरी बालाजीवाले आणि डॉ. सुनिता संकलेचा, हायजिन आणि न्यूट्रिशन चेअर यांनी माहिती दिली. त्याचबरोबर लाईफ स्किलचे प्रशिक्षक सागर भदाणे यांनीही विद्यार्थांना मार्गदर्शन केले. इंटरॅक्टनामाचे संपादक विनायक देवधर यांनी इंटरॅक्ट नामाबद्दल माहिती दिली. सचिव ओमप्रकाश रावत यांनी आभार मांडले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरेखा राजपूत यांनी केले.
………………………………….