पारनेर, शिरूर व श्रीगोंदा तालुक्यातीलशेतकऱ्यांसाठी बेलवंडी फाटा येथे भाजीपाला मार्केट सुरू

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
शिरूर बाजार समिती मध्ये दररोज सायंकाळी तरकारी मालाची खरेदी विक्री करण्यात येते. गेल्या पंधरा दिवसांपासून बाजार समिती प्रशासनाने ही खरेदी विक्री सायंकाळी न करता पहाटे चार वाजल्यापासून सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विशेषतः पारनेर व श्रीगोंदे तालुक्यातील शेतकऱ्यांपुढे मोठी समस्या निर्माण झाली होती. कडाक्याच्या थंडीत पहाटे चार वाजता तरकारी माल घेऊन शिरूर येथे पोहचणार कसे असा प्रश्न निर्माण झाला होता. रात्रीच तरकारी घेऊन गेलेल्या शेतकऱ्यांनी आवारात येऊ नये यासाठी बाजार समितीकडून मुख्य प्रवेशद्वारही बंद करण्यात येत होते. त्यामुळे शेतकरी वर्गाला थंडीमध्ये रात्र डोक्यावर घेऊन पहाटे चार वाजण्याची वाट पहावी लागत होती.
पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी मंगळवारी मध्यरात्री तरकारी माल घेऊन शिरूरमध्ये थांबलेल्या पारनेर व श्रीगोंदे तालुक्यातील शेतकऱ्यांची भेट घेत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. बाजार समिती प्रशासनाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता ते त्यांच्या भूमिकेवर ठाम होते. पारनेर व श्रीगोंदे तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय दिलाच पाहिजे अशी भूमिका घेत यावर काय तोगडा काढला पाहिजे अशी विचारणा केली गेली असता दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सोयीचे ठरेल असे बेलवंडी फाटा येथे तरकारी मार्केट सुरू करण्याची आग्रही मागणी आमदार लंके यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली.
मार्केेट सुरू करण्यासंदर्भात व्यापाऱ्यांशी ही संवाद साधला. व्यापाऱ्यांनी तयारी दर्शविल्यानंतर येत्या दोन तीन दिवसांत बेलवंडी फाटा येथे मार्केट सुरू करण्याची घोषणा केली होती. आमदार लंके यांनी आज अधिकृत पणे उद्घाटन करून सुरूवात केली. यासाठी राक्षे बंधूनी दोन एकर जागेसाठी सहमती दर्शवली यावेळी श्रीगोंदा,शिरूर व पारनेर तालुक्यातील पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्यासह असंख्य शेतकरी यावेळी उपस्थित होते.