पारनेरमध्ये तरूणावर कोयत्याचा वार 19 जणांविरोधात गुन्हा दाखल ,

दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी-
दोन गटात झालेल्या राड्यामध्ये तरूणावर कोयत्याने वार करण्यात आले.पारनेर शहरात सोमवारी सायंकाळी ही घटना घडली
या प्रकरणी दोन्ही गटाच्या 19 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांनी दिली. या प्रकरणातील सहभागींची पोलिसांनी धरपकड चालू केली आहे.
दोघा मित्रांमधील वाद मिटविण्याचा प्रयत्न केल्याच्या रागातून म्हसणे येथील देवा जंबे व त्याच्या सहकार्यांनी पारनेर शहरात सोमवारी सायंकाळी कोयते नाचवित धुडघुस घातला. कोयत्याने वार केल्यामुळे एक तरूण गंभीर जखमी झाला आहे. पारनेर पोलिसांनी काही आरोपींना सोमवारी रात्रीच ताब्यात घेतले असून उशिरापर्यंत त्यांना अटक केलेली नव्हती. आरोपींची ओळखपरेड सुरू असल्याचे तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक शैलेंद्र जावळे यांनी सांगितले.
या संदर्भात संदेश बाळू दिवटे (वय 25 रा. कडूस, ता. पारनेर) याने पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की संदेश याचा मित्र अक्षय चेडे याच्या भावाचे लग्न असल्याने दि. 27 नोव्हेंबरला संदेश कडूस येथून पारनेर येथे आला होता. दि. 28 रोजी अक्षय यास मदत म्हणून संदेश पारनेर येथेच थांबला होता. दि. 28 ला सायंकाळी पाचच्या सुमारास संदेश याचा भाऊ आदेश यास त्याचा मित्र अतुल औटी याचा फोन आला. संदेश याचा फोन स्पिकरवर होता, तर आदेश याच्यासोबत देवा जंबे (रा. म्हसणे) तसेच अतुल औटी (रा. पारनेर) कॉन्फरन्सवर बोलत होते. या संभाषणादरम्यान देवा जंबे याने आदेश यास शिविगाळ केली. आदेश हा अतुल व देवा जंबे यांच्यातील भांडण मिटविण्याचा प्रयत्न करीत होता. देवा याने शिविगाळ केल्याने आदेश यानेही देेवा यास शिविगाळ केली. त्याच वेळी देवा जंबे याने आदेश दिवटे यास पारनेर येथे येऊन कोयत्याने कापून टाकण्याची धमकी दिली. देवा जंबे हा दारू पिलेला असेल या समजुतीतून संदेश व आदेश दिवटे यांनी पोलिसांना याबाबत काही कळविले नाही.
सायंकाळी 7 च्या सुमारास संदेश दिवटे, अक्षय चेडे, रोहन चेडे, दिनेश कावरे, महेश नवले, स्वप्निल नवले, रामा मगर, महेश ठुबे शहरातील हॉटेल द्वारका येथे गप्पा मारत उभे असताना तेथे देवा जंबे, समीर माने (रा. म्हसणे, ता. पारनेर), ओंकार नगरे, अजय लष्करे (रा. सांगवी सुर्या, ता. पारनेर), संकेत इंगळे, अक्षय सागर, नरसाळे, अभिषेक औटी (रा. तराळवाडी, ता. पारनेर) यांच्यासह आठ ते दहा अनोळखी तरूण मोटारसायकलवर तेथे आले. समीर माने, ओंकार नगरे, अजय लष्करे यांच्या हातात कोयते होते तर इतरांकडे काठया, दगड होते. देवा जंबे याने तेथे येताच आदेश दिवटे याच्या पोटात दगडाने मारले, शिविगाळ करीत तुम्हाला आज तोडतो अशी धमकी दिली. दगड लागल्याने आदेश खाली पडला. त्यावेळी संदेश याने आदेश यास वाचविण्याचा प्रयत्न केला असता ओंकार नगरे याने त्याच्या हातातील कोयत्याने संदेश याच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. संदेशने खाली वाकून हात मधे घातल्याने त्याच्या हाताला कोयत्याने टोक लागून तो जखमी झाला. त्यानंतर ओंकार नगरे याने संदेश याच्या पोटावर वार केला. तो संदेश याच्या पोटास उजव्या बाजूस लागला. देवा जंबे याच्यासह त्याच्यासोबतच्या टोळक्याने सर्वांना कोयता, काठया, दगड, लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. आरडाओरडामुळे लोक जमा झाल्याचे पाहून देवा जंबे व त्याचे साथीदार तेथून पसार झाले. संदेश दिवटे याच्या फिर्यादीवरून आरोपींविरोधात खुनाचा प्रयत्न, दंगल घडवून आणण्याच्या उद्देशाने बेकायदा जमाव जमवून सशस्त्र हल्ला करणे, कट रचणे, शिविगाळ व दमदाटी करणे, जिल्हाधिकार्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे, अवैधरित्या शस्त्र बाळगणे, हाताळणे, हस्तांतरीत करणे आदी कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.