डीजे बंदीवरून टाकळी ढोकश्वरमध्ये राडा, महिला सरपंचाला शिवीगाळ , धक्काबुक्की, सरपंचासह ११ जणांवर गुन्हे दाखल

वसंत रांधवण
पारनेर प्रतिनिधी :
टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथे डीजे बंदी ठरावावरून वाद झाल्याने सरपंचासह ११ जणांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. सरपंच अरुणा प्रदीप खिलारी यांच्या फिर्यादीवरून माजी सरपंच शिवाजी खिलारी यांच्यासह इतर नऊ जणांवर शिवीगाळ व धक्काबुक्कीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
माजी सरपंच शिवाजी खिलारी यांच्या फिर्यादीवरून सरपंच अरुणा खिलारी, पती प्रदीप खिलारी, ग्रामपंचायत सदस्य सुनील चव्हाण विरुद्ध मारहाण व सोन्याची अंगठी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सरपंच अरुणा खिलारी यांनी फिर्यादीत म्हटले, की ग्रामपंचायतने सहा महिन्यांपूर्वी डीजे बंदीचा ठराव केला. शुक्रवारी (दि. १५) सकाळी साडेदहा दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयात मासिक मिटींग होती. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी सीताराम खिलारी, सुनिता जयसिंग झावरे, सुनील पोपट चव्हाण, सुग्रामी कादर, हवालदार गंगाधर बाळासाहेब निवडुंगे उपस्थित होते. सर्व सदस्य नसल्याने मिटींग रद्द केली. पावणेबाराच्या सुमारास शिवाजी सीताराम खिलारी यांच्यासह दत्ता मारुती झावरे, संकेत अशोक झावरे, विकास भाऊसाहेब वाळूज, ज्ञानदेव भाऊसाहेब पायमोडे, सुरज सुभाष झावरे, गणेश नानासाहेब बांडे, तेजस सतीश बांडे, विनायक महादू झावरे, पवन बाजीराव नरवडे (सर्व रा. टाकळी ढोकेश्वर) व इतर २० ते ३० जणांसह आले. मला दमदाटी करून तुम्ही डीजे बंदीचा ठराव घेऊन हे पत्र पोलिस स्टेशनला का दिले, असे म्हणत माझ्या अंगावर धावून आले.मला घेराव घालून शिवीगाळ केली. मी घाबरुन खुर्चीवरून उठल्यानंतर शिवाजी खिलारी, विकास वाळूज, दत्ता झावरे यांनी लज्जास्पद वर्तन केले.
माजी सरपंच शिवाजी खिलारी यांनी सरपंच अरुणा खिलारी, पती प्रदीप खिलारी व सुनील चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.::
विरोधकांचा कर्ता करविता बोलवता धनी प्रवरेचाच…
एकीकडे ग्रामपंचायतने डी. जे.बंदीचा ठराव केला असताना विकास कामे करून घेण्याऐवजी डीजे सारख्या वादग्रस्त विषयांवर येऊन राजकीय आकसापोटी महिला सरपंचाशी वाद घालणे ही बाब अशोभनीय नाही. त्यामुळे टाकळीढोकश्वर ग्रामपंचायतीतील विरोधकांचा कर्ता- धर्ता करविता बोलवता धनी प्रवरेचाच असल्याची टीका निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुकाअध्यक्ष बाळासाहेब खिलारी यांच्यासह उपसरपंच रामभाऊ तराळ, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष अंकुश पायमोडे, ओबीसी सेलचे मळिभाऊ रांधवण यांनी केला आहे.
टाकळीढोकश्वर ग्रामपंचायतीमध्ये ५० वर्षांपासूनची सत्ता संपुष्टात आणली असून एक महिला सरपंचाला त्रास देण्याचे काम विरोधकांचे चालू आहे. गेल्या तीन ते चार वर्षांच्या कार्यकाळात जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या राजकारणात काम करत असलेल्या प्रवरेच्या यंत्रणेची या बगलबच्च्यांना साथ असुन टाकळी ग्रामपंचायतने डीजे बंदीचा ठराव केला असतानाही नवीन वाद निर्माण करून महिला सरपंचांना अश्लील शिवीगाळ करून त्यांचा अपमान केला आहे. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मासिक मिटिंगमध्ये हा वाद झाला असून माजी सरपंच सुनिता झावरे, सुग्राबी हवलदार, उपसरपंच रामभाऊ तराळ, सुनील चव्हाण हे गंगाधर निवडुंगे व ग्राम विकास अधिकारी यांच्या समक्ष हा प्रकार घडला आहे.
१५ सप्टेंबर रोजी मासिक मिटिंगमध्ये माजी सरपंच शिवाजी खिलारी यांनी २० ते २५ मुलांना घेऊन सरपंच अरुणा खिलारी यांना शिवीगाळ केली व खुर्चीवरून खाली ढकलून दिले. त्यामुळे त्यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना टाकळीढोकश्वर येथिल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांनी पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे उपचार घेण्यास सांगितले.
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली या गावची सत्ता आल्यापासून खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे पाण्यात पाहत असल्याचा आरोप बाळासाहेब खिलारी यांनी केले आहे. जिल्हा परिषदेचे,जनसुविधा, व इतर माध्यमातून निधी अडवण्याचे काम खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले असून महिला सरपंचांना अश्लील शिवीगाळ अंगावर धावून जाऊन मीटिंग होऊ देऊ नका असा आदेश लोणी प्रवरेवरून आला व सध्या राज्यात भाजपा राष्ट्रवादी शिवसेना सरकार असतानाही वैयक्तिक स्वार्थापोटी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी अशी गावागावात भांडणे लावण्याचे काम प्रवरेची यंत्रणेकडून होत असल्याचा आरोप बाळासाहेब खिलारी, उपसरपंच रामभाऊ तराळ, अंकुश पायमोडे, मळिभाऊ रांधवण यांनी केला आहे.