स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी खा. विखेंची धडपड : आ. लंके यांची टीका

बाजार समिती निवडणूक प्रचाराचा शुभारंभ
दत्ता ठुबे
पारनेर : प्रतिनिधी
विधानसभेच्या तीन निवडणूकांमध्ये आ. नीलेश लंके यांनी माझ्या विजयासाठी परीश्रम घेतले. चौथ्या निवडणूकीत पाडून टाकलं तुम्हाला काय अडचण ? आमच्या आमच्यात आम्ही काहीही करू, तुमचं दुखायचं कारण काय ? असा टोला लगावत विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांनी खा. डॉ. सुजय विखे यांच्यावर शरसंधान केले.
महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास मंडळाच्या प्रचाराचा शुभारंभ सुपा गटातील पळवे खुर्द येथे करण्यात आला. त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याच्या अध्यक्षपदावरून औटी हे बोलत होते. आमदार नीलेश लंके हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना औटी म्हणाले, महाराष्ट्रात जे सध्या सुरू आहे ते शहाणपणाचं नाही. संजय राऊत यांच्यासारखी किती माणसं तुरूंगात टाकली ? शेवटी न्यायालयानेच सांगितले की पुरावाच नाही, नंतर त्यांना सोडून द्यावं लागलं. १०० दिवस माणसाला जेलमध्ये सडवलं ना ? जनतेच्या मतावर तयार झालेलं तुमचं सरकार आहे ना ? त्याच पक्षाचे प्रतिनिधीत्व करणारे आम्हाला येथे येऊन सांगणार असतील तर आम्ही दोघे एकत्र आलो म्हणून फार काही वेगळं घडलं का ? असं काय घडलं ? माझ्या तिनही निवडणूकांमध्ये आ. नीलेश लंके यांनी विजयासाठी परीश्रम घेतले. चौथ्या निवडणूकीत पाडून टाकलं. आमच्या आमच्यात आम्ही काहीही करू, तुमचं दुखायचं कारण काय ?
औटी पुढे म्हणाले, राजकारणात कधी कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो. कार्यकर्ते विनाकारण एकमेकांमध्ये शत्रुत्वाची भावना निर्माण करतात. त्याला खतपाणी घालतात. कोणत्याही राजकीय शक्ती एकत्र आल्या की त्यांना अडचणी निर्माण होतात. कुठेतरी वाचनात आलं की विजय औटी म्हणजेेच शिवसेना आहे का ? या उमेदवारांमध्ये उपजिल्हाप्रमुख, तालुका प्रमुखाची पत्नी, मुंबईतील बाळासाहेबांचा हाडाचा शिवसैनिक आहे मग मी कशाचा रे बाबा मालक ? मुंबईत शरद पवार बसलेले आहेत. त्यांचा सहकारी म्हणून मी देखील काम केले आहे. त्यांनी उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री केले.ही माणसं जर सभ्यतेने वागतात तर आमच्यावर काही संस्कार आहेत की नाही ? आयुष्यभर आम्ही फक्त भांडायचंच का ? यात जनतेचे हित आहे का ? आपण केलेल्या राजकीय ध्रुवीकरणातून इतरांना उत्तर देणारी ही निवडणूक आहे. त्यामुळेच या निवडणूकीस महत्व आहे. पक्षाचा मला आदेश आला. भाजपाशी जुळवून न घेता राष्ट्रवादीसोबत युती करा. कुठेतरी महाराष्ट्राच्या हितासाठी लोकसभा, विधानसभा निवडणूकांच्या बाबतीत काहीतरी धोरण ठरले असेल ना, त्यामुळेच तालुका पातळीवर आदेश आला असेल असे औटी यांनी स्पष्ट केले.
आमदार नीलेश लंके म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे आदर्श काम चालले आहे. तालुक्यातही महाविकास आघाडीच्या माध्यमातून राजकारण व्हावे असे माझ्यासह विजय औटी यांनाही वाटत होते. कुठेतरी थांबूले पाहिजे या भावनेतून शेतकऱ्यांचे हित जोपासणाऱ्या या संंस्थेच्या निवडणूकीत एकत्र येण्याचा आम्ही निर्णय घेतला. गेल्या पाच वर्षात सभापती प्रशांत गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी संस्थेचा पारदर्शक कारभार केला.या पुढील काळातही बाजार समितीचा नावलौकिक राज्यपातळीवर झाला पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न राहील. निवडणूकीनंतर निफाड बाजार समितीला भेट देण्यासाठी सर्व संचालकांना नेण्यात येऊन निफाडच्या धर्तीवर पारनेर बाजार समितीचा लौकिक निर्माण करू अशी ग्वाही लंके यांनी दिली.
अर्जुन भालेकर, शिवाजी बेलकर, मारूती रेपाळे, डॉ. श्रीकांत पठारे, राजेश शेळके, सुरेश बोऱ्हूडे, बाळासाहेब पोटघन, अमोल यादव, दौलत गांगड, सचिन पठारे, दिपक पवार, सचिन काळे, राहुल झावरे, संदीप चौधरी, सचिन पवार, भाऊसाहेब भोगाडे, संजय तरटे, किसनराव कळमकर, सुभाष लोंढे, सुरेश कळमकर, जयसिंग धोत्रे, संतोष तरटे, प्रसाद तरटे, अंबादास तरटे, बाळासाहेब लंके, आबासाहेब इरकर, वसंत देशमुख, संतोष शेळके, रामभाऊ शेळके, अरूण कळमकर, विनायक पवार, भाऊ जाधव, अमोल शेळके, विठ्ठल पोटघन, रोहिदास नवले, दादाभाऊ शेळके, राजू वाबळे, अनिल करपे, संतोष तरटे, यांच्यासह विविध गावांचे सरपंच, उपसरंच, सदस्य, सेवा संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक उपस्थित होते
राष्ट्रवादी आणि शिवसेनेने या निवडणूकीत एकत्र लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेकांना शॉक बसला. अनेकांना वाटत होते हे दोघे एकत्र येऊच शकत नाहीत. राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो. वाटाघाटी, तडजोडी न करता निर्णय घेण्यात आला. आमचा निर्णय काहींना मान्य झाला नाही तर काहींना मान्य झाला. सगळेच निर्णय सगळयांना मान्य होतीलच असे नाही. महाविकास आघाडीची हीच ताकद यापुढील निवडणूकांमध्ये दिसून येईल. तुम्ही निकालाची चिंता करू नका. आमचे दोघांचे फोटो पाहिल्यानंतर मला शेेकडो फोन आले शेतकरी विकास पॅनल मोठया मताधिक्क्याने विजयी होणार आहे.
नीलेश लंके आमदार
▪️
उत्तरेचं वारं आलंय….
विरोधकांचा पॅनल हे भुछत्र आहे. त्यांच्याकडे कोणतेही व्हिजन नाही. त्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी उत्तरेचं वारं दक्षिणेत आलंय. तालुक्यात संघर्ष उभा करून देण्यासाठी ही निवडणूक लादली गेली असून स्वाभिमानी तालुका कोणाच्याही भुलथापांना बळी पडणार नाही. हे त्यांना दाखवून देण्याची वेळ आली आहे. मोठया फरकाने सर्व १८ जागा विजयी करून संघर्ष निर्माण करणारांना जागा दाखवून द्या असे आवाहन आ. लंके यांनी केले.
काहींना सौदेबाजीची सवय !
माझ्याजवळ इतकी मते आहेत, ती विकायचीत. त्यासाठी काही मागेे थांबले नाहीत ना ? अशी मला शंका येऊ लागली आहे. काही लोकांना सौदेबाजीची सवयच लागलेली असल्याचा टोला औटी यांनी लगावला.
लोकप्रतिनिधींच वलय टिकविण्याची जबाबदारीया निवडणूकीत लोकप्रतिनिधीच्या आब्रुचाही प्रश्न आहे. आज महाराष्ट्र पातळीवर स्वतःच्या कर्तुत्वावर जे काही आ. नीलेश लंके यांनी वलय निर्माण केलं आहे ते टीकविण्याची आपली जबाबदारी नाही का ? त्यासाठी ही निवडणूक आपल्याला जिंकावीच लागेल. आपल्यासमोर दुसरा पर्याय नाही. ते हारले तर दोन दिवस पेपरला बातम्या येतील. तसेही ते आजच हारलेले आहेत.विजय औटी माजी आमदार
नीलेश आमचीच देणगी
या मेळाव्यास राष्ट्रवादीचे अनेक जण आहेत. परंतू हे लक्षात ठेवा नीलेश लंके आमच्यातूनच गेलेले आहेत. आमची देणगी आहे ती तीला व्यवस्थित सांभाळा असा सल्ला औटी यांनी यावेळी दिला मला जनतेने पंधरा वर्षे संधी दिली. नवीन माणसाला संधी मिळाल्यानंतर त्याला काम करायला पुर्ण मोकळीक दिली पाहिजे.अडचणी निर्माण करायच्या नाहीत म्हणून मी तिन, साडेतीन वर्षे सार्वजनिक कार्यक्रमांत सहभागी झालो नाही. सकाळ, दुपार, संध्याकाळ उठ सुट चुकीची भाषा वापरायची हे शहाणपणाचं लक्षण नाही. या निवडणूकीच्या निमित्ताने जे घडवलं ते चांगल्या भावनेतून घडवलं आहे असे औटी यांनी सांगितले.
फेटे बांधून येऊ मतदार मोजून घ्या !
सुपा गटामध्ये राष्ट्रवादी व शिवसेनेचीच ताकद आहे. सेवा सोसायटी व ग्रामपंचायतीचे येथे जमलेले मतदार पारनेरला मतदानाला येताना फेटे बांधून येतील. औटी साहेब मतदान केंद्रावर तुम्ही व आमदार साहेब या गटातील मतदार मोजून घ्या, आम्ही सर्वाधिक लीड देणार आहोत.
सतीश भालेकर
सदस्य, ग्रामपंचायत, वडनेर हवेली.
अक्षय्य तृतीयादिनी विजयाचा संकल्प करू या असे सांगत पुरोगामी विचारांच्या तालुक्यात मतभेद दुर ठेऊन महाविकास आघाडीची निर्मिती करण्याचा घेण्यात आलेला निर्णय चांगला असल्याचे विक्रमसिंह कळमकर यांनी सांगितले. सुपा गटातून सर्वाधिक लिड देण्याची ग्वाही कळमकर यांनी दिली.
युती झाली आणि निकाल जाहीर
होणार, होणार नाही अखेर झाली ! महाविकास आघाडी प्रत्यक्षात निवडणूकीत उतरल्यानंतर निवडणूकीचा निकाल जाहीर झाला असून दोन महाशक्ती एकत्र आल्याने महाविकास आघाडी ही निवडणूक एकतर्फी जिंकणार आहे.
अमोल यादव
परमेश्वराने युती घडवून आणली
शेतकऱ्यांची उंचीवर असणारी तालुक्यातील ही एकमेव संस्था आहे. आजवर या वैभवाला गालबोट लागू नये यासाठी आपण प्रयत्न केले. या संस्थेची अशीच भरभराट व्हावी यासाठी नीलेश लंके व विजय औटी यांची ही युती परमेश्वराने घडवून आणली आहे. या युतीला नैतिकतेचे अधिष्ठाण आहे.
मारूती रेपाळे
माजी संचालक, बाजार समिती
गोंधळ घालणारा नेता बाहेर गेला
मागील पंचवार्षिक निवडणूकीत नेतृत्व करणारा नेता गोंधळ घालत होता. तो नेता आता राष्ट्रवादीतून बाहेर गेला आहे. तालुक्याच्या हितासाठी राष्ट्रवादी व शिवसेना यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. भविष्यात बाजार समिती अधिक सक्षम होईल यात शंका नसल्याचे सबाजीराव गायकवाड यांनी सांगितले
तीन मिनिटात माघार
महाविकास आघाडी झाल्यामुळे राष्ट्रवादीच्या जागा घटल्या. मलाही उमेदवारी देण्यात आली होती. जागा वाटपाच्या सुत्रामध्ये अडचण निर्माण झाल्याने आ. लंके यांनी आपणास अर्ज मागे घेण्याची सुचना केली. अवघे तीन मिनिटे शिल्लक असताना आपण अर्ज मागे घेतला.आम्ही आ. लंके यांच्यासाठीच राजकारण करतो. त्यांचा शब्द माझ्यासाठी प्रमाण आहे. पद येईल, जाईल त्याची आपण चिंता करीत नाही.
दौलत गांगड
माजी उपरपंच
यापुढे महाविकास आघाडीचेच राजकारण हा माझा राजकिय निर्णय आहे. कोणाला पटो ना पटो. पुढे काय होईल हे मला माहीती नाही. परंतू जोपर्यंत महाविकास आघाडी महाराष्ट्रात एकत्रीत राहिल तोपर्यंत या तालुक्यात सुध्दा महाविकास आघाडीच्याच माध्यमातून राजकारण केले जाईल. शरद पवार, उध्दव ठाकरे, बाळासाहेब थोरात यांना अडचण नाही मग आपल्याला काय अडचण ?
विजय औटी माजी आमदार
खरेदी विक्री संघाचा खेळ झाला. साखर कारखाना, दुध संघाचा कार्यक्रम झाला. ऐवढंच राहिलंय आता. की संस्था टीकविण्यासाठी आपला हातभार लागावा यासाठी निर्णय घेतला तर लगेच पाचच जागांवर समाधान अशी टीका. तुझं काय दुखलं ? गुपचूप वाटाघाटी वगैरे काही नाही. माझा निर्णय पक्का होता. संख्यात्मक बलाबल हा विषय नाही. ही संस्था चांगल्या अवस्थेत आहे. ती अधिक सशक्त कशी करता येईल या चांगल्या भावनेतून आम्ही एकत्र आलो आहोत असे औटी यांनी सांगितले.
मविआचा पहिला फायदा पारनेर तालुक्याला
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्याचा पहिला फायदा पारनेर तालुक्याला झाला. जिल्हा परिषदेत बांधकाम व कृषी समिती शिवसेनेच्या वाटयाला आली. सभापतीपद मिळालं की महाविकास आघाडी चांगली. रामदास भोसलेंंच्या पदरात काही पडलं की वाईट. सगळं आपल्या सोईनं कसं होईल ? उमेदवारांमध्ये औटी, लंके आहे का कोणी? सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत कोणासाठी भेटलो आम्ही ? असा टोला औटी यांनी यावेळी लगावला.