टाकळी ढोकेश्वर येथे आरोग्य आहार प्रात्यक्षिक परीक्षा दिन साजरा

रुग्णांसाठी योग्य आहार महत्त्वाचा : डॉ. स्वाती खिलारी
पारनेर/प्रतिनिधी :
आजच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येकाने आपली प्रगती केली आहे. हे जरी खरे असले तरी त्याच झपाट्याने विविध प्रकारच्या आजारांचे प्रमाण वाढते आहे. अयोग्य आहार, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव यामुळे आजारांना जणू काही एक प्रकारचे आमंत्रण देत आहेत असे प्रतिपादन डॉ.सौ. स्वाती खिलारी यांनी केले.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या आजारांना बळी पडू नये म्हणून यासाठी सकस व चौरस आहार घेणे गरजेचे आहे.
जेणेकरून शरीर सदृढ ठेवता येईल. गर्भवती महिलांनी आपल्या रोजच्या आहारात दिवसातून एकवेळ सकस आहार घेणे गरजेचे आहे. जेणेकरून सदृढ बालक जन्माला येईल. त्याचप्रमाणे विविध आजारग्रस्त रुग्णांना त्यांच्या गरजेनुसार योग्य आहार देण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सावली स्कूल ऑफ नर्सिंग मध्ये आरोग्य आहार प्रात्यक्षिक परीक्षा दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी अध्यक्ष डॉ. भाऊसाहेब खिलारी, म्हणाले की आजारपणामुळे रूग्णांची मानसिकता बदलेली असते. त्यामुळे रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर व नातेवाईकांनी त्यांना समजून घेणे गरजेचे आहे यावेळी सावली प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ भाऊसाहेब खिलारी, डॉ. सौ स्वाती खिलारी, यांच्यासह डॉ मिरा पुरी, डॉ निमसे मॅडम, प्राचार्य सुशांत शिंदे, श्वेता शिंदे, प्रा. नामदेव वाळुंज, गणेश चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रम आयोजन व नियोजन प्रा. आयशा शेख, प्रा. योगिता अडसूळ यांनी केले.