इतर

अहमदनगरमधील केडगावातील तेल कंपनीला भीषण आग; लाखोंचे नुकसान

अहमदनगर : केडगाव इंडस्ट्रीयल इस्टेटमधील तेलाच्या कंपनीत रविवारी (दि.21) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे कंपनीत आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून, आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

केडगाव भागातील आग लागलेल्या साईराज इंडस्ट्रीज या कंपनीत तेलाचे उत्पादन केले जाते. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरीक व कंपनीतील कर्मचार्‍यांनी धाव घेतली. उपस्थित नागरीकांनी आगीची माहिती महापालिकेच्या अग्निशामक दलाला घटनेची माहिती कळवली. त्यानंतर अग्निशामक दलाची एक छोटी गाडी घटनास्थळी हजर झाली. परंतु, आग मोठी असल्याने परिस्थिती आटोक्यात आली नाही. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा करणार्‍या टँकरद्वारे आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नगरसेवक व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, नगरसेवक संग्राम शेळके, मनोज कोतकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले. सायंकाळी उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते. पाणीपुरवठा करणार्‍या टँकरने आग विझवावी लागल्याने आगीच्या या घटनेनंतर महापालिकेच्या अग्निशमन विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

अग्निशमन विभागाचा उपयोग काय ?

केडगाव भागात सुरू असलेल्या टँकर आणि एमआयडीसी येथील अग्निशमक दलाच्या मदतीने आग विझवावी लागली. परंतु, महापालिकेच्या दोन्ही गाड्या वेळेवर उपयोगात आल्या नाहीत. त्यामुळे अग्निशमन विभागाचा उपयोग तरी काय ? असा सवाल उपस्थित करत पालिकेच्या भोंगळ कारभारावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे ताशेरे ओढले.

दोन्ही गाड्या गॅरेजमध्ये

अग्निशमन विभागाला आगीची माहिती दिल्यानंतर एकच छोटी गाडी घटनास्थळी हजर झाली. दोन्ही मोठ्या दुरूस्तीसाठी गॅरेजमध्ये असल्याचे कारण प्रशासनाकडून पुढे करण्यात आले. मनपा अग्निशमन विभागाच्या निष्काळजीपणामुळे आग विझविण्यासाठी विलंब झाल्याचाही आरोप उपस्थितांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button