खिरविरे येथील जिओ टॉवर तात्काळ सुरू करा

अकोले/प्रतिनिधी –
अकोले तालुक्यातील ग्रामीण भागातील एक बाजारपेठ म्हणून खिरविरे गावचे नाव सतत चर्चेत आहे. दळणवळणाच्या दृष्टीने देखील अनेक गाव, वाडया, वस्त्या या गावाशी सतत निगडीत आहेत. गावात सरकारी दवाखाना, शाळा, कॉलेज देखील कार्यरत आहे.तत्रज्ञानात सुधारणा झाली तशी लोकांचे रहाणीमान देखील सुधारले.जनसंपर्क वाढत चालला आहे. मोबाईल, कंम्प्युटरचा जमाना सुरू झाला आहे. या सुधारीत तंत्रज्ञानाला मात्र ग्रामीण भागात खिळ बसली आहे. गेली अनेक वर्षासापुन येथील रिलायन्स जिओ टॉवर बंद स्थितीत पहायला मिळत आहे. यामुळे खिरविरे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठराव घेऊन दहा दिवसात टॉवर चालू करण्यात यावा, नसेल शक्य तर कायमचा बंद करण्यात यावा असा ठराव घेऊन संगमनेर येथील जिओ टॉवर ऑफीसचे संचालक यांना ग्रामपंचायतीने लेखी पत्र दिले आहे. यापुर्वी देखील खिरविरे ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थ यांनी अनेक वेळा पत्रव्यवहार केला होता. परंतु सबंधीत अधिकाऱ्यांकडून सदर पत्रव्यावहाराला केराची टोपली मिळाली. कोणतीही कार्यवाही झाली नाही, फक्त तोंडी आश्वासनेच मिळाली. गेल्या वर्षापासुन फक्त नवीन तारीख कळवत आहेत. त्यामुळे मागील काळात फार मोठा मनस्ताप येथील नागरीक तसेच शालेय विदयार्थ्यांनी सहन केला आहे.करोनाच्या काळात देखील ऑनलाईन शिक्षणामध्ये रेंज नसल्यामुळे शालेय विदयार्थी,कर्मचारी यांना फार मोठा मनस्ताप सहन करावा लागला. त्याचा परीणाम गुणवत्तेवर झाला असल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे दहा दिवसात नेटवर्क सुरू केले नाही तर गावातुन टॉवर हद्दपार करण्यात येईल. सबंधीत टॉवरला मिळणाऱ्या सुविधा,रस्ता, लाईट कनेक्शन इत्यादीवर निर्बंध लावले जातील. याची दखल घेऊन खिरविरे येथील सबंधीत जिओ टॉवर सुरू करावा अन्यथा आपण जर टॉवर सुरू करण्यास असमर्थ असाल तर तुमचा टॉवर तुम्ही काढून घ्यावा. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा खिरविरे येथील ग्राम पंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य तसेच संतप्त नागरीकांनी लेखी पत्राद्वारे दिला आहे.