मराठी शाळांमध्ये व्यवहार ज्ञान आणि सामाजिक भान मिळते शिक्षणाधिकारी भास्कर पाटील

अकोले, प्रतिनिधी
“मातृभाषेतून शिकताना मुलांना संकल्पना स्पष्ट होतात, विषय नीट समजतात. तणावमुक्त वातावरणात विद्यार्थी आनंदभराने शिक्षण घेतात. मूल्याधिष्ठित शिक्षणाबरोबरच जीवनाचे शिक्षण आणि संस्कार देणाऱ्या मराठी शाळा मुलांची मातीशी असलेली नाळ तुटू देत नाहीत. बाल आनंद मेळाव्यासारख्या उपक्रमांमुळे मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. व्यवहारिक ज्ञान आणि सामाजिक भान केवळ जिल्हा परिषदेच्या शाळाच देऊ शकतात. जिल्हा परिषदेच्या शाळांतील शैक्षणिक गुणवत्ता कौतुकास्पद असल्याने पालकांचा ओढा पुन्हा एकदा जिल्हा परिषद शाळांकडे वाढत असल्याचे सकारात्मक चित्र दिसत आहे,” असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी केले. पाटील यांनी आपल्या भाषणात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. शिष्यवृत्ती परीक्षेसह स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गांमुळे दिवसेंदिवस यशाची कमान उंचावत असून त्यातून पालकांचा कल वाढला आहे. आगामी काळात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इंग्रजी भाषा शिक्षणासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील असे त्यांनी सांगितले.

अकोले तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या पुढाकारातून, प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली ‘आपली शाळा मराठी शाळा‘ या विशेष प्रचार मोहिमेच्या प्रचाररथाचे पूजन पाटील यांच्या हस्ते अकोले येथे झाले. अकोले तालुका पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी जालिंदर खताळ यांनी प्रास्ताविकात अकोले तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुरू असलेल्या शैक्षणिक उपक्रमांचा लेखाजोखा मांडला. विस्तार अधिकारी अरविंद कुमावत, अनिल गायकवाड, राहाता तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे, विकास वाव्हळ आदी मान्यवर उपस्थित होते. .

भाऊसाहेब चासकर यांनी मोहिमेमागील उद्देश सांगितला. विस्तार अधिकारी बाळासाहेब दोरगे यांनी आभार मानले. शिक्षक नेते राजेंद्र सदगीर, शिक्षक बँकेचे संचालक अण्णासाहेब आभाळे, अनिल मोहिते, समन्वयक गोरख देशमुख, अशोक आवारी, भाऊसाहेब कासार, बाळू खाडे, सतीश वैद्य, शिवाजी भोजने, मारुती बांगर, शिल्पा भांगरे, विजय गोरडे, केंद्रप्रमुख विजय भांगरे, राम साबळे, एकनाथ पटेकर, स्वाती अडाणे, रोहिणी खतोडे, आंबादास गारुडकर, नरसाळे, बाळासाहेब जाधव, शकील बागवान, आणि मोठ्या संख्येने प्राथमिक शिक्षक यावेळी उपस्थित होते.
