विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या संधीचे सोने करून ध्येयाकडे वाटचाल करावी- संपतराव दसपुते

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालय हे जिल्ह्यातील एक नावलौकिक प्राप्त असे कनिष्ठ महाविद्यालय आहे. या ठिकाणी शिक्षण घेण्याच्या मिळालेल्या संधीचे विद्यार्थ्यांनी सोने करून आपल्या ध्येयाकडे योग्य वाटचाल करावी असे प्रतिपादन आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संपतराव दसपुते यांनी पालक मेळाव्याप्रसंगी केले .
आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालय, शेवगाव या ठिकाणी विद्यार्थी -शिक्षक – पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संपतराव दसपुते, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पालक प्रतिनिधी माजी पंचायत समिती सदस्य, बाळासाहेब कोळगे, बाबासाहेब देवढे, राजेंद्र आरगडे ,जयश्री आहेर हेमा देवढे, उपप्राचार्या श्रीमती रूपा खेडकर, पर्यवेक्षक प्रा. शिवाजी पोटभरे ,प्रा. अशोक तमनर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्य दसपुते आपल्या मनोगतात म्हणाले, की विद्यार्थी व पालकांनी काळानुरूप बदलणे अत्यंत गरजेचे आहे . विद्यालयीन जीवनात शिक्षणाबरोबरच संस्कार देखील अत्यंत महत्त्वाचे असतात. कनिष्ठ महाविद्यालयात विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे पालकांनी जागरूक राहून आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी कनिष्ठ महाविद्यालयास सहकार्य करावे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पालक प्रतिनिधी श्री . बाळासाहेब कोळगे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, देशाचे उज्वल भविष्य हे तुमच्या हातामध्ये आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षकांनी दिलेल्या आज्ञेचे पालन करावे तसेच भविष्यात उच्च पदावर गेल्यावर आई वडील, समाज यांच्याप्रती असलेले कर्तव्य पार पाडावे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीची माहिती पालकांना कळावी म्हणून पालक मेळाव्याचे आयोजन केले जाते. त्यामुळे सर्व पालकांनी देखील पालक मेळाव्याला प्रतिसाद द्यावा.यावेळी शिक्षक प्रतिनिधी अशोक तमनर, पर्यवेक्षक शिवाजी पोटभरे यांनी आपले विचार व्यक्त केले .पालक प्रतिनिधी कु .पूजा टाक यांनी देखील आपले विचार व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या श्रीमती रूपा खेडकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिमा उकिर्डे यांनी केले.मंजुश्री बुधवंत यांनी सर्व पालकांचे व उपस्थितांचे आभार मानले.