जागतिक बाल दिनानिमित्त उडान व मुक्ती वाहिनीची प्रभावी जनजागृती

पारनेर प्रतिनिधी:-
प्रत्येक बालकाला शिक्षण, संरक्षण, आरोग्य, प्रेम आणि सुरक्षित भविष्याचा हक्क आहे.ही जागरूकता सर्वदूर पोहोचावी म्हणून दरवर्षी २० नोव्हेंबर रोजी जागतिक बाल दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेला हा दिवस जगभरातील बालकांचे अधिकार अधोरेखित करण्यासाठी आणि समाजाला जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण मानला जातो. त्याच अनुषंगाने जागतिक बाल दिनानिमित्त स्नेहालय संस्थेच्या उडान व मुक्ती वाहिनी प्रकल्पातंर्गत अहिल्यानगर शहरातील विविध सेवा वस्त्यांमध्ये प्रभावी जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.
बालकांचे हक्क, अधिकार, संरक्षण आणि त्यांना भेडसावणाऱ्या वास्तव समस्यांविषयी मुलांमध्ये तसेच पालकांमध्ये थेट संवाद साधून जाणिवा निर्माण करण्यात आल्या.गेल्या 36 वर्षांपासून स्नेहालय संस्था बालकांचे हक्क, संरक्षण, सुरक्षितता आणि पुनर्वसनासाठी सातत्याने आणि अत्यंत संवेदनशीलतेने कार्यरत आहे. या संकल्पनेतूनच सुटकेची गरज असलेल्या, संकटात अडकलेल्या, अत्याचारग्रस्त किंवा हरवलेल्या बालकांसाठी 24×7 कार्य करणारा मुक्ती वाहिनी हा महत्वाचा प्रकल्प निर्माण झाला.
अहिल्यानगर जिल्हा बालत्याचार मुक्त जिल्हा करणे हे ध्येय समोर ठेवून मुक्ती वाहिनीचे कार्य अधिक वेगाने सुरू आहे.
जागतिक बाल दिनाचे औचित्य साधत जागृतीचे पर्व
कार्यक्रमाची सुरुवात जागतिक बाल दिनाचे महत्त्व, बालकांचे हक्क (शिक्षण, संरक्षण, आरोग्य, सन्मान, सुरक्षितता, खेळ), तसेच प्रत्येक बालकाला समान संधी उपलब्ध होण्याची गरज यावरील चर्चेने झाली.त्यानंतर सेवा वस्त्यांमध्ये जात बालसभा, पालक-बाल संवाद, वस्ती पातळीवरील चर्चासत्रे आयोजित करण्यात आली.
सेवा वस्त्यांमध्ये अनेक मुले मूलभूत अधिकारांपासून वंचित राहतात. परंतु आजच्या उपक्रमामुळे त्यांच्या मनात स्वतःच्या हक्कांविषयी जागृती, सुरक्षिततेची भावना आणि आत्मविश्वास निर्माण झाल्याचे प्रत्यक्ष पाहायला मिळाले.
या जनजागृती मोहिमेत ॲड. बागेश्री जरंडीकर व हनिफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रविण कदम, शाहिद शेख, पूजा दहातोंडे, सीमा जुनी, विनायक महाले, निशा वाघ, प्रतीक्षा वाघही टीम पूर्ण समर्पणाने काम करत आहे.बालकांचे सुरक्षित भवितव्य हेच आमचे ध्येय मुलांच्या हक्कांबाबत जागरूक समाजच सुरक्षित आणि प्रगत समाज घडवू शकतो. सेवा वस्त्यांतील प्रत्येक मूल शिक्षण, संरक्षण आणि प्रेमाचे हक्क मिळवून सक्षमपणे वाढावे, यासाठी स्नेहालयची टीम पुढील काळातही अशाच संवेदनशील आणि प्रभावी उपक्रमांद्वारे कार्य करत राहणार आहे.



