पैठण चे संतूआई देवस्थान बनले भाविकांचे श्रद्धा आणि भक्तीचे केंद्र

.कोतुळ प्रतिनिधी : निसर्गरम्य वातावरणाच्या सान्निध्यात असलेले अकोले तालुक्यातील पैठण येथील संतू आईचे देवस्थान सध्या भाविकांच्या श्रद्धा आणि भक्ती चे केंद्र बनत आहे.
हभ प संपत महाराज तळेकर यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना संतू आईचा साक्षात्कार झाला त्यांच्या मनात या ठिकाणी मंदिर उभारण्याची प्रेरणा निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी परिसरातील जागेची साफसफाई आणि उत्खननाचे काम सुरू केले. या कामा दरम्यान मूर्ती आढळल्याचे ते सांगतात. या घटनेमुळे त्यांच्या श्रद्धेला अधिक बळ मिळाले आणि संतू आईच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा त्यांनी दृढ निश्चय केला.
संतू आईचे हे स्थान जागृत आणि नवसाला पावणारे देवस्थान असल्याची परिसरातील भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे परिसरातून भाविक दर्शनासाठी येथे येत आहेत. सध्या देवस्थानाचे स्वरूप साधे असले तरी भाविकांची वाढती संख्या आणि श्रद्धा पाहता भविष्यात या ठिकाणी मोठ्या धार्मिक स्थळाचा विकास होण्याची शक्यता आहे.
“संपूर्ण जीवन संतू आईच्या चरणी अर्पण करणार” या देवस्थानाच्या विकासासाठी आपले संपूर्ण जीवन संतू आईच्या चरणी अर्पण करण्याचा मनोदय संपत महाराज तळेकर यांनी व्यक्त केला आहे. मंदिराचा जीर्णोद्धार, परिसराचे सुशोभीकरण आणि भाविकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याचा त्यांचा संकल्प आहे.
संतू आईच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी लोकवर्गणीतून निधी उभारण्यात येणार असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचा मानस असल्याचे संपत महाराज तळेकर यांनी सांगितले.
ग्रामस्थ, भाविक, दानशूर व्यक्ती आणि संतू आईवर श्रद्धा असणाऱ्या भाविकांनी या कार्यात सहभागी व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
आज साध्या स्वरूपात असलेले संतू आईचे हे स्थान भविष्यात भव्य मंदिर आणि विकसित धार्मिक स्थळ म्हणून आकाराला यावे, असा संकल्प करण्यात आला आहे. मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर पैठण परिसरातील हे देवस्थान भाविकांसाठी श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिक ऊर्जेचे महत्त्वाचे केंद्र ठरेल, अशी भावना भाविकांकडून व्यक्त होत आहे.
=====



