कुस्तीपटू पै.कांडेकर यांना सुवर्णपदक मिळाल्याने नेप्ती ग्रामस्थांनी केला सन्मान

अहमदनगर- नेप्ती (ता. नगर) येथील कुस्तीपटू पै. हर्षवर्धन गोरक्ष कांडेकर याने दौंड येथे झालेल्या विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये१२५ किलो वजन गटामध्ये सुवर्णपदक मिळवले . तसेच स्पर्धेतील विजयाने त्याची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्यांचा नेप्ती ग्रामस्थ व साई संजीवनी प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्यात आला.
ग्रामपंचायत कार्यालया समोर माजी सरपंच विठ्ठल जपकर व सरपंच संजय अशोक जपकर यांच्या हस्ते कांडेकर याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य देवा होले, माजी सरपंच सुधाकर कदम, उपसरपंच संजय आसाराम जपकर माजी उपसरपंच शिवाजी होळकर, साई संजीवनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रघुनाथ होळकर, छबुराव जपकर ,रामदास फुले सौरभ जपकर, अभिजीत जपकर, बंडू गुरुजी जपकर, दादू चौगुले, गोरख इंगोले, पै. ऋषी खामकर, माणिक होळकर, दिनेश राऊत, अतुल गवारे, राजू गवारे, बादशाह सय्यद, सुनील पवार, साई कांडेकर,शिवाजी खामकर ,सुरेश कदम आदी उपस्थित होते.
हर्षवर्धन गोरक्ष कांडेकर हा नेप्ती गावातील पैलवान असून, तो केडगावच्या भाग्योदय विद्यालयात शिकत आहे. नुकतीच शालेय विभागीय कुस्ती स्पर्धा दौंड पारगाव येथील कर्मयोगी कुस्ती संकुलात पार पडली. ग्रीकोरोमन कुस्ती स्पर्धेत कांडेकर याने १२५ किलो वजन गटात पुणे विभागात विजेतेपद पटकाविले आहे. कांडेकर याने उपांत्य सामन्यात पुणे जिल्ह्यातील तर अंतिम सामन्यात सोलापूर जिल्ह्यातील पैलवानचा पराभव करून विजेतेपद फटकाविले.
यावेळी सरपंच संजय जपकर म्हणाले की, नेप्ती गावाला कुस्ती क्षेत्राचा मोठा वारसा असून, अनेक दिग्गज मल्ल या मातीतून घडले आहेत. कुस्तीपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी गावातील यात्रोत्सवात कुस्ती हगामा घेऊन कुस्तीपटूंना रोख बक्षीसांचा वर्षाव केला जातो. हर्षवर्धन कांडेकर याने गावाचे नाव उंचावले असून, त्याने मिळवलेले यश गावातील युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थितांनी काडेकर याला पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
पै. कांडेकर याला स्पर्धेसाठी प्रशिक्षक तानाजी नरके यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल गोरक्ष कांडेकर, मुख्याध्यापक ज्ञानदेव बेरड, क्रीडा शिक्षक एकनाथ होले, भरत कांडेकर, मल्हारी कांडेकर, शांताराम साळवे, पै. योगेश पवार, पै. मनोज फुले यांनी त्याचे अभिनंदन केले.
………….