मानसिक रुग्ण हा सामाजिक कलंक राहिलेला नाही – श्री. व्ही सुधाकर यार्लगड्डा

अहमदनगर दि.१०
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर, अहमदनगर बार असोसिएशन, सेंट्रल बार असोसिएशन अहमदनगर व जिल्हा रुग्णालय, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यामाने सोमवार, दि.१० ऑक्टोंबर २०२२ रोजी जिल्हा रुग्णालय, अहमदनगर येथे मानसिक आरोग्य दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर व्ही. यार्लगड्डा हे होते. यांच्या हस्ते धन्वंतरी देवतेची पूजा करून दिप प्रज्वलन करण्यात आले. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात न्यायालयात मानसिक रुग्णांना दवाखान्यात भरती करण्यासाठी येणाऱ्या अडचणींचा मागोवा घेतला. मानसिक रुग्ण हा सामाजिक कलंक नसतो असे मत त्यांनी मांडले. चिंता व ताणताण प्रत्येकाला असतो परंतु काहींना ताण व चिंता सहन करण्याची क्षमता नसते तेव्हा त्यांना आराम, समुपदेशन आणि नंतर औषध उपचाराची गरज असते असे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले तसेच, मानसिक आजार असलेल्या रुग्णांची व परिवारातील सदस्यांची अडचण समजून घेऊन त्यांना आधार द्यावा असे आवाहन केले.
श्रीमती. भाग्यश्री का. पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर यांनी आपल्या भाषणात एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत चालली असून, विभक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात येत आहे. त्या कारणाने घरातील सदस्यांमध्ये एकटेपना वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे एकमेकांमधील संवाद कमी होत चालला असल्या कारणाने मानसिक आरोग्य बिघडत चालले आहे असे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. कराळे यांनी केले तसेच मानसोपचार तज्ञ डॉक्टर तेजस्विनी मिस्किन यांनी ”गाव तेथे मानसोपचार” अशी पद्धती अमलात आणली असून त्यामुळे एखादा रुग्ण जिल्हा रुग्णालयापासून कितीही लांब असला तरी फोनद्वारे तो डॉक्टरांशी संपर्क करू शकतो उपचार घेऊ शकतो हे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गोरक्ष इंगुले यांनी केले व आभार प्रदर्शन डॉ. मीनल कातकोल यांनी केले. सदर कार्यक्रमास प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.दर्शना बारवकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पडोळे, मानसोपचार तज्ञ डॉ. कराळे, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. पानसंबळ, स्नेहालयाचे प्रमुख गिरीश कुलकर्णी, ॲड. अभय राजे, ॲड विक्रम वाडेकर तसेच जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी व जिल्हा रुग्णालयाचे रुग्ण व कर्मचारी उपस्थित होते.