केंद्रातील भाजप सरकार विरोधात मोठा असंतोष – माकप

मा. क. प. चा शिर्डीत लोकसभेला भाऊसाहेब वाकचौरे यांना जाहीर पाठिंबा !
अकोले, प्रतिनिधी
केंद्रातील भाजप व मित्र पक्षांच्या सरकारने सत्तेवर आल्यापासून सातत्याने शेतकरी, कष्टकरी, श्रमिक विरोधी धोरणे घेऊन देशातील बड्या उद्योगपती व कॉर्पोरेट घराण्यांना पोसण्याचे काम केले आहे. शेतकरी, शेतमजूर, कामगार व कर्मचाऱ्यांना यामुळे अनंत यातना व वेदना सहन कराव्या लागत आहेत. शेतीमालाचे भाव सातत्याने पाडले जात आहेत. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस इत्यादींच्या महागाईने कहर केला आहे. भ्रष्टाचार, इलेक्टोरल बॉंड, ईडी-सीबीआयचा दुरुपयोग, मणिपूर व इतरत्र होत असलेले महिलांवरील अत्याचार, यासारख्या सर्व बाबींमुळे भारतीय जनतेचे जीवन पराकोटीचे असह्य झाले आहे. लोकांच्या मनात यामुळे नरेंद्र मोदी व भाजप सरकार विरोधात मोठा असंतोष खदखदतो आहे.
जनतेच्या मनातील या असंतोषाचे रूपांतर मतदानात होऊन आपली सत्ता जाऊ नये यासाठी व आपला धर्मांध अजेंडा पुढे रेटण्यासाठी, सत्ताधारी भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) देशात देव, धर्म, जात, व प्रांताच्या अस्मितांना खतपाणी घालून जनतेच्या एकजुटीत फूट पाडत आहे. सत्तेचा दुरुपयोग करून पक्ष फोडले जात आहेत. स्वातंत्र्य युद्धात असंख्य बलिदाने देऊन मिळविलेले स्वातंत्र्य, संविधान, लोकशाही, धर्मनिरपेक्षता उद्धवस्त केली जात आहे.
अशा पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने देशाचे संविधान, लोकशाही व धर्मनिरपेक्षता वाचविण्यासाठी व शेतकरी-शेतमजूर-कामगार-कर्मचारी श्रमिकांच्या हक्कांचे रक्षण व्हावे यासाठी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्यांच्या धर्मांध व कॉर्पोरेटधार्जिण्या धोरणांना साथ देणाऱ्या संधिसाधू पक्ष व प्रवृत्तींचा पराभव करण्याचा संकल्प केला आहे.
शिर्डी लोकसभा मतदार संघात या धोरणानुसार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने व सर्व भातृभावी संघटनांनी इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे या मतदार संघातील उमेदवार मा. खा. भाऊसाहेब वाकचौरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मतदार संघातील सर्व सहा विधानसभा क्षेत्रातील २९ जनसंघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची विस्तारित बैठक पक्षाच्या अकोले येथील कार्यालयात संपन्न झाली. किसान सभा, जनवादी महिला संघटना, सिटू कामगार संघटना, एस.एफ.आय. विद्यार्थी संघटना व डी.वाय.एफ.आय. युवक संघटनेच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या या बैठकीत मतदार संघातील विविध गावातील प्रमुख शेतकरी कार्यकर्ते, आशा, अंगणवाडी, अर्धवेळ परिचर, बांधकाम कामगार, वन जमीन धारक, निराधार, गावठाण जमीन धारक, हिरडा उत्पादक, दूध उत्पादक आदी 29 संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत सहभाग घेतला. सर्वांनी एकमताने धर्मांध व कॉर्पोरेट धार्जिन्या भाजपचा पराभव करण्यासाठी श्री. भाऊसाहेब वाकचौरे यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले.
यानंतर पक्षाच्या कार्यालयात येऊन उमेदवार श्री. भाऊसाहेब वाकचौरे यांनी पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.मतदार संघातील सर्व श्रमिक जनतेने श्री. भाऊसाहेब वाकचौरे यांना मतदान करावे असे आवाहन यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आल्याचे डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, एकनाथ मेंगाळ, नामदेव भांगरे, मेहबुब सय्यद, नंदू गवांदे, ॲड. ज्ञानेश्वर काकड यांनी म्हटले आहे
——–