इतर

पत्रकार सन्मान योजनेच्या जाचक अटी शिथिल होणार

मुंबई :बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेतील जाचक अटी लवकरच रद्द करण्याची घोषणा मंत्री शंभूराजे देसाई यांनी आज विधान परिषदेत केली..सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील असंख्य ज्येष्ठ आणि वयोवृद्ध पत्रकारांचा रखडलेला पेन्शनचा प्रश्न मार्गी लागणार आहे.. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी सरकारला त्याबद्दल धन्यवाद दिले आहेत.
मराठी पत्रकार परिषदेच्या पिंपरी चिंचवड येथील अधिवेशनात परिषदेने केलेल्या मागणीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेन्शन योजनेत वाढ करून ती 11 हजारांवरून 20 हजार रूपये करण्याची घोषणा केली होती. मात्र त्याचा शासनादेश निघाला नव्हता तो दोन दिवसात काढण्याची घोषणाही आज सरकारने केली आहे..
विधान परिषदेत विविध आमदारांनी आज लक्षवेधीच्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न उपस्थित केले. त्याला सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत पत्रकारांच्या विविध मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.
मराठी पत्रकार परिषदेच्या प्रयत्नातून स्थापन झालेल्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीतील रक्कम वाढविण्याची घोषणाही आज सरकारने केली.. ही रक्कम सध्या 50 कोटी रुपये आहे.. ती वाढवून 100 कोटी रूपये करावी अशी मराठी पत्रकार परिषदेची मागणी आहे…
पत्रकारांच्या विविध प्रश्नांच्या संदर्भात मराठी पत्रकार परिषद सातत्यानं आवाज उठवत असते. मराठी पत्रकार परिषदेने समोर आणलेले पत्रकारांचे सर्व प़श्न सोडविण्यासाठी एक अभ्यासगट नेमला जाईल असेही शंभुराजे देसाई यांनी जाहीर केले आहे.. तसेच केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील डिजिटल माध्यमांसाठी धोरण आखले जाईल अशी घोषणाही सरकारने केली आहे..
पत्रकारांच्या प्रश्नांच्या बाबतीत सरकारच्या सकारात्मक भूमिकेबाबत मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी यांनी सरकार, शंभूराजे देसाई, डॉ. निलमताई गोऱ्हे, आणि लक्षवेधी देणाऱ्या सर्व आमदारांचे आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button