
दत्ता ठुबे
अहमदनगर प्रतिनिधी
हिवाळी अधिवेशनापूर्वी होणाऱ्यां मंत्रीमंडळ विस्तारात माजी मंत्री आणि विद्यमान आमदार राम शिंदे यांची राज्य मंत्रीमंडळात वर्णी लागणार का ? याबाबत मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये ‘उत्कंठाता’ शिगेला पोहचली आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात नगर जिल्ह्यातील आणखी एक आमदारांची वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे.पहिल्या पंगतीत राधाकृष्ण विखे-पाटील मंत्री झाले आणि त्यांचा खांद्यावर पालकमंत्री पदाची जबाबदारी आली; आपसुकच भाजपचे जिल्हातील ‘श्रेष्ठी’ ही ठरले आहेत.त्यामुळे त्यांच्या कडून कोणत्या नावाला हिरवा कंदील मिळतो, त्यांचे स्थान मंत्री मंडळात अढळ ठरणार राहिल, हे मात्र निश्चित..! यामध्ये आमदार राम शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात, त्यामुळे त्यांचे नाव आघाडीवर आहे, असे असले तरी आमदार बबनराव पाचपुते आणि आमदार मोनिका राजळे यांचीही नावे चर्चेत आहेत. मात्र राजळेंची वर्णी लावताना , राज्यातील किमान दोन महिलांचा समावेश मंत्री मंडळात करण्याचे भाजपचे धोरण असल्याचे वरिष्ठ स्तरावरुन सातत्याने बोलले जाते. त्यामुळे मोनिका राजळे यांचे नाव राज्यातील नावांच्या पंगतीत जाऊन बसेल . राजळें बरोबरच आमदार देवयानी फरांदे, आमदार माधुरी मिसाळ यांची नावे देखील मंत्री पदासाठी चर्चेत आहेत.
त्यामुळे या तिघींपैकी दोघींनाच स्थान मिळाले आणि यामध्ये राजेंळेंची संधी हुकली तरच शिंदे-पाचपुतेंच्या नावावर ‘खल’ होईल. यामध्ये ही तब्बेतीचे कारण व खुल्या प्रवर्गातील एक नगर जिल्ह्यातील नेत्याला संधी दिल्यामुळे पाचपुतेंना ‘कट’ बसू शकतो आणि ओबीसी नेते म्हणून शिंदेंचे नाव आघाडीवर येऊ शकते ; मात्र प्रत्यक्षात नावावर शिक्कामोर्तब होण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची ‘समंती’ महत्वाची असणार आहे. शिंदे यांना मात्र राज्यस्तरावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे बळ मिळाले असले तरी नगर जिल्ह्यात विखे-पाटील महत्वाची राजकीय शक्ती आहे. शिंदे हे कर्जत-जामखेड मतदारसंघातून येतात आणि येथे सध्याआमदार रोहित पवार हे प्रतिनिधित्व करतात, त्यांचे वाढते राजकीय प्राबल्य आणि विखे-पवारांचे राजकारणातील विळ्या- भोपळ्याचे सख्खे सर्वश्रुत आहे. त्यामुळे विखे-पाटील पवारांना शह देण्यासाठी आपली ताकत आमदार राम शिंदेंच्या पाठीशी उभी करतील का ? विखे-पाटील शिंदेंना समंती दर्शवतील का ? त्यांच्या वाटेत साखर पेरणी करतील का ? यांवरच शिंदेंची मंत्रीपदाची ‘भिस्त’ ठरणार आहे.