सहकार

रौप्य महोत्सवी वर्षातील भोजडे नं 2 सोसायटीची वार्षिक सभा थाटामाटात संपन्न



संजय महाजन

शिर्डी प्रतिनिधी:

भोजडे नं 2 विविध कार्यकारी सहकारी संस्थेला 25 वर्ष पूर्ण झाल्याने नुकतीच रौप्य महोत्सवी वर्षातील वार्षिक सभा व आदर्श सभासद पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. सन 2023-24 या आर्थिक वर्षातील आदर्श सभासद श्री विजय रंगनाथ पा. सिनगर यांना सद्गुरू नारायणगिरीजी महाराज आश्रम चिंचडगावचे महंत ह.भ.प.राजेश्वरगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते पुरस्कारातील चेक व सन्मानचिन्ह सन्मानाने प्रधान करण्यात आले. यावेळी सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शिर्डी लोकसभा मतदार संघांचे लोकप्रिय खासदार लोकनेते आदरणीय भाऊसाहेब वाकचौरे साहेब तर प्रमुख अतिथी म्हणून आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आदरणीय पुरुषोत्तम पगारे सर आणि भोजडे गावचे भूमिपुत्र, GST विभागाचे उपायुक्त आदरणीय चंद्रकांत मंचरे साहेब व्यासपीठावर उपस्थित होते.
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज व संस्थेचे संस्थापक चेअरमन कै. सिताराम पा. सिनगर यांना अभिवादन करत दिपप्रज्वलन करून सभेची सुरुवात करण्यात आली. यानंतर सभेच्या नोटीशीचे वाचन करत अहवालसालात दिवंगत सभासद, शेतकरी आणि देशासाठी विरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून विषयपत्रिकेतील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. यावेळी संस्थेचे चेअरमन मुकुंद सिनगर यांनी प्रमुख अतिथीचे स्वागत, परिचय आणि प्रास्ताविक करून संस्थेचा लेखाजोखा आणि आजपर्यंत सहकार क्षेत्रात करत आलेल्या कामकाजाची माहिती दिली. यानंतर भोजडे गावचे सरपंच सुधाकर वादे आणि चेअरमन मुकुंद सिनगर यांनी एकत्र मिळून भोजडे गावच्या पुढील पाच वर्षासाठीचा एकूण 75 लाख रुपयांचा विकास आराखडा खा. वाकचौरे यांच्यासमोर लेखी सादर केला आणि भोजडे गावच्या विकासात भर घालण्याची विनंती केली.
यानंतर संस्थेचे मार्गदर्शक मा. शहाराम पा. सिनगर यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या कार्याचा गौरव करत गावातील हिंदू-मुस्लिम बंधूभाव कायम टिकून राहावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. नंतर प्रमुख अतिथीच्या भाषणात आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री. पुरुषोत्तम पगारे सर आणि GST विभागाचे उपायुक्त श्री. चंद्रकांत मंचरे साहेब यांनी संस्थेच्या कामकाजाचे आणि विशेषतः चेअरमन यांच्या दूरदृष्टीचे कौतुक करत सहकारात योग्य दिशेने वाटचाल सुरु असल्याने समाधान व्यक्त करत शुभेच्छा दिल्यात. शेवटी अध्यक्षीय भाषणात खा. वाकचौरे यांनी भोजडे गावाशी माझा अनेक वर्षाचा ऋणानुबंध असून येथील संस्थेचे संचालक मंडळ प्रामाणिक सहकार करून पुढे जात असल्याचा मोठा आनंद असून सहकारात स्वाहाकार करणारी मंडळी एका बाजूला आणि सहकारात आपल्या माणसांना मोठं करणारा तरुण सहकारी मुकुंद सिनगर यांचा खरोखर अभिमान असून संपूर्ण गाव त्याचा पाठीमागे असल्याने मी पण त्याच्या मागे भक्कमपणे उभा असल्याचे गौरोदगार काढले. यावेळी गावचे सरपंच आणि संस्थेचे चेअरमन यांनी एकत्रित दिलेल्या रुपये 75 लाख रुपयाचा विकास आराखडा मी स्वीकारला असून तात्काळ त्यातील 10 लाख रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देत उर्वरित रक्कम पुढील वर्षी टप्याटप्याने देण्याबाबत जाहीर करताच उपस्थित भोजडे ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून आभार व्यक्त केले. गावचा कारभार तरुणांच्या हाथात दिला तर कायापालट झाल्याशिवाय राहत नाही. यात भोजडे गावची एकजूट आणि त्यांतच चारुदत्त, मुकुंद, सुधाकर आणि दीपक या तरुणांनी गावच्या विकासासाठी बाळगलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी सर्वोतोपरी मदत करणार असून भोजडे गाव माझ्यासाठी विशेष प्रेमाचे असल्याने अधिक लक्ष देण्याचे आश्वासन दिले. यानंतर महंत राजेश्वरगिरीजी महाराज यांनी आशीर्वाद देताना प्रामाणिक कर्म करणारा व्यक्ती सर्वश्रेष्ठ असून सहकारातून सेवा करत शुद्ध हेतूने काम करणाऱ्या संस्थेची नक्कीच भरभराट होईल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी प्रमुख उपस्थितीत सरपंच सुधाकर वादे, उपसरपंच सलीम शेख, चेअरमन रंगनाथ नाना सिनगर, भाऊसाहेब पा. सिनगर, संभाजी पा. सिनगर, अनंत तात्या सिनगर, साहेबराव पा. सिनगर, धर्मा जावळे, प्रविण चौधरी, बबन वैद्य, तान्हाजी लामखडे, विष्णू पाडेकर, परसराम आबा धट, तान्हाजी थोरमिसे यांच्यासह भोजडे ग्रामस्थ व पंचक्रोशीतील अनेक हितचिंतक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे व्हा.चेअरमन दिनकर बा. सिनगर, संचालक सर्व श्री. दीपक धों. धट, रावसाहेब दे. सिनगर, ज्ञानेश्वर ब. सिनगर, अशोक रा. मंचरे, शंकर भ. सिनगर, रामनाथ चां. चंदणे, फकीरचंद रा. जेऊघाले, राजेंद्र गो. घनघाव, संचालिका सौ. प्रमिला ग. गोंदकर, सौ. वंदना ब. सिनगर, सौ. जिजाबाई भी. शिंदे, सचिव गणेश तू. बारहाते, मदतनीस मधुकर अं. सिनगर, लेखा परीक्षक राजेंद्र सूर्यवंशी यांच्यासह अंगणवाडी सेविका आणि विद्यार्थी तसेच संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पोटे सर यांनी तर शेवटी संचालक शंकर सिनगर यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button