राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शिर्डी उपखंड विभागाचा विजयादशमी उत्सव संपन्न

शिर्डी प्रतिनिधी :
संजय महाजन
विजया दशमी उत्सव संघाच्या स्थापनेचा म्हणजेच वर्धापन दिनाचा उत्सव. स्वयंसेवकांनी वर्षभर केलेल्या संघ कार्याचा आढावा व शक्ती प्रदर्शनाचा उत्सव. हिंदू समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण करण्यासाठी हे आयोजन करण्यात येते.
संघाची स्थापना 1925 ला नागपूर येथे झाली होती. आज या स्थापनेला 99 वर्षे पूर्ण होत आहेत व संघ शताब्दी कडे वाटचाल करत आहे. शिर्डीतील हे संघकार्य गेली 57 वर्षे अविरतपणे चालू आहे.
शिर्डीतही या उत्सवाचे मोठ्या उत्साहाने आयोजन करण्यात आले. श्रीरामनगर संघ स्थानावर एकत्रीकरण होऊन सघोष पथसंचलन संपूर्ण गणवेशात ध्वजारोहण करून प्रार्थना होऊन सुरू करण्यात आले.
यावेळी घोषवादनासाठी दोन पथके सामील करण्यात आली. एका रथावर ध्वज धारकाजवळ भगवा ध्वज देण्यात आला. त्यानंतर दंड वाहिनीसह इतर वाहिन्या क्रमशः आज्ञा देऊन संचलन मार्गस्थ झाले. श्रीराम नगर, मनमाड रस्ता ते पालखी मार्ग करून श्री साईनाथ हायस्कूलमध्ये संचलन कार्यक्रमाचे ठिकाणी येऊन पोहोचले. संचलन मार्गात सडा रांगोळी, स्वागत पुष्प वृष्टी, सजावट करण्यात आली होती. यावेळी जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून वैचारिक विमर्श विभागाचे श्री रविंद्र (राजूभाऊ) मुळे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून ह.भ.प. नवनाथ मस्के महाराज होते. तालुका, संघचालक रावसाहेब गोंदकर पा. हेही मंचावर उपस्थित होते. यावेळी ध्वजारोहण करून मान्यवरांच्या हस्ते शस्त्र पूजन करण्यात आले. सुभाषित, अमृतवचन, वैयक्तिक गीत सादर केले.
यावेळी ह.भ.प. नवनाथ महाराज मस्के म्हणाले, शांततेच्या मार्गाने जर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले असेल तर बलिदान दिलेल्या क्रांतिकारकांचे स्थान व त्यांनी केलेल्या संघर्षाचे काय.. असा प्रश्न उपस्थित होतो. परकीय सत्तेशी लढत असताना अनेकांना आपले कुटुंब उद्ध्वस्त होताना पहावे लागले. देव, देश आणि धर्मासाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. असे परखड मत व्यक्त केले.
यावेळी रविंद्र (राजूभाऊ) मुळे यांनी आपण प्रचारक असताना शिर्डीतील त्यांच्याबरोबर काम करणारे कार्यकर्ते, स्वयंसेवक जे आज हयात नाहीत त्यांना आठवण करत श्रद्धांजली अर्पण केली. शिर्डीत आज संघाचे दिसणारे चित्र त्यांच्या मेहनतीने दिसत आहे. अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी वर्ष सध्या चालू असल्याने त्यांनाही अभिवादन करण्यात आले. पुढे ते म्हणाले की, श्री साईबाबा यांच्या बद्दल वैचारिक भेद निर्माण केला जात आहे. साईबाबांचा उल्लेख श्रीपाद श्रीवल्लभ यांचे चरित्रात आढळतो हे सत्य आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल शंका घेण्याच कोणालाही काही कारण नाही. हा वैचारिक भेद निर्माण करून षडयंत्र केले जात आहे. भारत ही विश्वकल्याणाचा वसा घेतलेली संस्कृती आहे. धर्म म्हणजे नीतिमूल्य जपणारा आपला देश आहे. धर्म म्हणजेच जीवन जगण्याची कला पद्धत आहे. स्वसंरक्षणासाठी शस्त्र बाळगणे हाही आमचा धर्म आहे. आत्तापर्यंत झालेल्या आक्रमणाशी आपण सर्वांनी झुंज दिलीच आहे. आमच्या दैवताच्या हातातही शस्त्र होते आम्ही त्याचीही पूजा करतो. आतापर्यंत झालेल्या आक्रमणामुळे आमच्या भारत मातेला अनेक जखमा झालेल्या आहेत. जोपर्यंत समाजातील प्रत्येक हिंदू स्वयंसेवक होत नाही तोपर्यंत त्या बऱ्या होणार नाहीत. शिवरायांच्या काळातही त्यांना भीती घालणारे, विरोध करणारे हिंदू होतेच. आज त्यांच्यातलीच काही वंशवेल शिल्लक आहे. आज त्यां लोकांचा वापर करून वैचारिक, सांस्कृतिक, धर्मावरील आक्रमणे असे वेगवेगळे आक्रमण समाजात दिसून येत आहेत. आपली व्यापार व्यवस्था ग्लोबल मार्केटिंग च्या नावाखाली उध्वस्त करण्याचे काम देखील चालू आहे. आपली अर्थव्यवस्था डबघाईस आणण्याचा प्रयत्न होत आहे. आपल्याला याला उत्तर द्यायचे असेल तर जत्रा आणि यात्रा हा मार्ग उचित होणार नाही. याला आपल्याला शंभर टक्के मतदान करूनच उत्तर हे द्यावे लागेल. सामाजिक प्रबोधन करावे लागेल. हे निश्चित आहे.
त्यानंतर प्रार्थना करून कार्यक्रमाचा समारोप झाला. मोठ्या संख्येने सघोष व पूर्ण गणवेशातील उपस्थिती लक्ष वेधून घेत होती. यावेळी समाजातील अनेक नागरिकांनी सहभाग घेतला होता. वातावरणात एक चैतन्याची बहर आली होती.