टाकळी ढोकेश्वर ते पारनेर रस्त्याची दुरावस्था; रस्ता दुरुस्तीची मागणी

दत्ता ठुबे
पारनेर दि. १ – टाकळी ढोकेश्वर ते पारनेर हा दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा रस्ता सध्या पूर्णपणे खड्ड्यांच्या साम्राज्याखाली गेला आहे. गेल्या काही दिवसांत या भागात झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. जागोजागी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे,
हा महत्त्वाचा रस्ता खराब झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये आणि प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, संबंधित ठेकेदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी हे जनतेच्या या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रवासी संघटना करत आहेत.
प्रवाशांनी या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची जोरदार मागणी केली आहे.
या मागणीनुसार, लोकप्रतिनिधींनी यावर गांभीर्याने लक्ष देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाची त्वरित बैठक बोलावून रस्ते दुरुस्तीच्या कामाला गती द्यावी आणि नागरिकांचे हाल थांबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जर यावर त्वरित कार्यवाही न झाल्यास, प्रवाशांनी आंदोलनाचा पवित्रा घेण्याचा इशारा दिला आहे.



