अमृतवाहिनी कॅम्पसमध्ये माजी विद्यार्थ्यांचे २ फेब्रुवारीला संम्मेलन

संगमनेर प्रतिनिधी
अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या कॅम्पसमध्ये रविवार दिनांक २ फेब्रुवारी, २०२५ रोजी सर्व महाविद्यालये आणि शाळांचे माजी विद्यार्थी संम्मेलन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय, अमृतवाहिनी तंत्रनिकेतन, अमृतवाहिनी बी फार्मसी, डी फार्मसी, आय.टी.आय., अमृतवाहिनी मॉडेल स्कुल, इंटरनॅशनल स्कुल, निडो इंटरनॅशनल स्कुल यांच्या माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ. शरयुताई देशमुख यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सन १९७८ साली स्वातंत्र्य सेनानी स्व. भाऊसाहेब थोरात यांनी सुरु केलेल्या अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेमध्ये आज १० हजार विद्यार्थी अभियांत्रिकी, कृषी, फार्मसी, व्यवस्थापन या व्यावसायीक आणि शालेय शिक्षण घेत आहेत. या 45 वर्षात संस्थेने गुणवत्ततापुर्ण शिक्षण, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यावसायीक शिक्षण देऊन यश मिळवले आहे. या कालावधीत अनेक पुरस्कार संस्थेस मिळालेले आहेत. माजी विद्यार्थी संम्मेलन या आगोदर एक किंवा दोन वर्षानंतर प्रत्येक महाविद्यालयात होत असते. परंतु यावर्षी संस्थास्तरावर प्रथमच माजी विद्यार्थ्यांचे संम्मेलन होत आहे. याआगोदर दिल्ली, गुरगांव, दुबई येथे अशा प्रकारचे संम्मेलने आयोजित करुन माजी विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिलेला आहे.
संम्मेलनाच्या दिवशी सकाळी नोंदणी केल्यानंतर माजी विद्यार्थी मुख्य कार्यक्रमास सहभाग नोंदवतील. यामध्ये सर्व महाविद्यालये, शाळा यांच्या सिनियर माजी विद्यार्थ्यांचे संवाद आणि चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहेत. यावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असतील आणि प्रमुख पाहुणे मा. आ. डॉ. सुधीरजी तांबे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी आपआपल्या क्षेत्रात दिग्गज पदावर काम करत असणाऱ्या सर्व सिनीयर माजी विद्यार्थ्यांचे अनुभव, आठवणी व विचार जाणुन घेण्यासाठी आजी विद्यार्थी तसेच नुकतेच आपल्या क्षेत्रात करीअर सुरु करु पाहणाऱ्या पदवीधर, पदव्युत्तर माजी विद्यार्थ्यांना मागदर्शनाची पर्वणी ठरणार आहे. कार्यक्रमानंतर सर्व माजी विद्यार्थी आपआपल्या कॉलेज, शाळांमध्ये भेट देणार असून यावेळी शिक्षक व आजी विद्यार्थ्यांशी संवाद साधतील.
याबरोबरच दुपारच्या सत्रात सुरुची भोजना बरोबरच ‘टेकटॉक’ म्हणजे अत्याधुनिक मुद्यांवर चर्चासत्र होणार आहे. ज्यामध्ये माजी विद्यार्थी सहभाग नोंदवतील. सायंकाळी मेधा प्रांगण येथे संगीताचा आणि गायनाचा “म्युझीक कन्सर्ट” आयोजित केलेला असून यासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डायरेक्टर डॉ. जे.बी. गुरव आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.ए. व्यंकटेश यांनी केले आहे.
विद्यार्थी मेळावा हा प्रेरणा देणारा कार्यक्रम
– सौ. शरयुताई देशमुख
अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेमध्ये प्रथमच सर्व महाविद्याय, शाळा यांचे एकत्रीत माजी विद्यार्थी संमेलन आयोजित करतांना विशेष आनंद होत आहे. खरेतर हा विद्यार्थी मेळावा इतरांना प्रेरणा देणारा कार्यक्रम आहे. याकरिता महाराष्ट्र, देशभरातुन आणि इतर देशातील सर्व माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ. शरयुताई देशमुख यांनी केले आहे